महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत

डॉ. पतंगराव कदमांच्या 'लोकतीर्थ' स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

  • महाराष्ट्राचा स्वाभिमान मोदीकडे गहाण ठेवू नका, राज्यात मविआचे सरकार आणा: मल्लिकार्जुन खरगे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी: राहुल गांधी
  • पलूस कडेगावच्या दुष्काळी भागाचा कायापालट डॉ. पतंगराव कदमांनी केला: शरद पवार.
  • डॉ. पतंगराव कदम यांचे कार्य मोठे, ते सर्वसामान्यांचे प्रेरणास्थान: नाना पटोले.

मुंबई – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत आहे, त्याला कोणीही हलवू शकत नाही. तीन पक्ष मिळून चांगले काम करत आहोत. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’चा संदेश दिला आहे, न घाबरता काम करा. भाजपा युती सरकार गुजरातच्या इशा-यावर काम करत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी मोदींकडे गहाण ठेवू नका. लोकसभेप्रमाणेच भरघोस पाठिंबा देत विधानसभेला मविआचे सरकार आणा, असे आवाहन करुन महाराष्ट्रात मविआचे सरकार आले की केंद्रातील मोदी सरकारही जाईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील वांगी येथे झाला, या कार्यक्रमात खरगे बोलत होते. खरगे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श, प्रेरणास्रोत आहेत पण नरेंद्र मोदींचा हात त्यांच्या पुतळ्याला लागताच पुतळा कोसळला. मोदींनी गुजरातमध्ये पुलाचे उद्घाटन केले तो पडला, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले, त्याला गळती लागली. नरेंद्र मोदी हे मतांसाठी दिखाव्याचे काम करतात. घाईघाईत पुतळा बनवल्याने तो कोसळला व महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान झाला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली पण ही माफी त्यांनी पुतळ्याचे काम आरएसएसच्या व्यक्तीला दिले, त्यात भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली का? असा सवाल विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे असे म्हणाले. शेतकरी आंदोलनात ७०० शेतकरी शहीद झाले, नोटबंदीमुळे लघु, छोटे, मध्यम उद्योग संपवले व लाखो लोकांचे रोजगार घालवले, चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावला त्याबद्दलही माफी मागा, असे राहुल गांधी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून गावोगावी शैक्षणिक संस्था उभा करून सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडली, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातील अनेक भागात शिक्षण संस्था सुरु केल्या. शिक्षणाबरोबर दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या पलुस कडेगाव भागाचा कायापालटही पंतगराव कदम यांनी केला आहे, असे पवार म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले म्हणाले की, पतंगराव कदम हे सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान आहेत, सामान्य कुटुंबात जन्माला आलेले पतंगराव कदम स्वकर्तृत्वाने मोठे झाले. पलूस कडेगाव भागात त्यांनी आरोग्य, शिक्षण, कृषी क्षेत्रात विविध कामे करून या भागाचा विकास केला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, खा. छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खा. प्रणिती शिंदे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, गोवा दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, माजी आमदार मोहनदादा कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विक्रम सावंत, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!