धक्कादायक! दिवा-मुंब्रा स्थानका दरम्यान लोकल मधून पडून 6 प्रवाशां चा मृत्यू… लटकणाऱ्या प्रवाशाना बाजूने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस ने घासल्याने घडली दुर्घटना
मुंबई : कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकलला लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मृत्यू झालेले सहा जण कसारा-सीएसएमटी लोकलमधील प्रवासी होते, असंही समजतंय. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी खाली पडले. छत्रपती शिवाजा महाराज टर्मिनलवरून पुष्पक एक्स्प्रेस निघाली होती. तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे लोकल जात होती. या लोकलच्या दरवाजावर लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले गेले आणि त्यांचा तोल गेला.
घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था तातडीने केली जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली. त्याचप्रमाणे या घटनेनंतर रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे प्रवासी रेल्वे रुळावर नाही, तर रुळाच्या बाजूला पडले, असं लीला यांनी सांगितलं आहे.
घडलेल्या घटनेवर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.’घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. घडलेल्या घटनेचा तपास करणं गरजेचं आहे. पुष्पक एक्स्प्रेसमधील घटना आहे. त्यामुळे चौकशीमध्ये नक्की कारण समजेल. त्यामुळे आता अंदाज व्यक्त करणं योग्य नाही. प्रशासनाच्या काही त्रुटी असतील तर कारवाई होईल. रुग्णसेवा देखील लवकरच घटना स्थळी पोहचेल…’ असं संजय केळकर म्हणाले.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिला आहे. ‘दिवा – मुंब्रा मार्गावर अशा घटना कायम घडत असतात. त्यामुळे प्रशासनाने ज्या योजना आणि काळजी घेतली पाहिजे, ते याठिकाणी दिसून येत नाही. खरंतर हा मार्ग संपूर्ण देशाच्या मार्गाला सांभाळणारा मार्ग आहे आणि याच मार्गावर सतत घटना घडत असतील प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे.’ या घटनेसाठी जबाबदार कोण? यावर अविनाश जाधव म्हणाले, ‘प्रशासन आणि त्या भागातील नेते घटनेला जबाबदार आहेत. कारण तुम्ही खासदार, आमदार आहात आणि तुम्हाला आपल्या भागामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा आपल्या भागातील लोकांच्या सुरक्षेसाठी काय करायला हवं कळलं पाहिजे…’ असं देखील अविनाश जाधव म्हणाले.