आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीचा जत्रोत्सव ९ फेब्रुवारी २०२६ रोजी निश्चित!

मुंबई: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या श्री देवी भराडी देवीचा बहुप्रतिक्षित वार्षिक जत्रोत्सव अखेर निश्चित झाला आहे. देवीचा कौल (हुकूम) घेऊन ही जत्रेची तारीख ९ फेब्रुवारी २०२६ ही ठरवण्यात आली आहे.
बुधवार, ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी देवीचा कौल घेतल्यानंतर ही तारीख जाहीर करण्यात आली. भराडी देवीच्या जत्रेसाठी महाराष्ट्रभरातून, तसेच परराज्यातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने येत असल्याने या तारखेला विशेष महत्त्व असते.
जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर, मंदिरामध्ये आवश्यक धार्मिक विधी आणि तयारी सुरू करण्यात आली आहे.
आंगणे कुटुंबियांनी आणि देवस्थान समितीने सर्व भाविकांना जत्रोत्सवाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही जत्रा मोठ्या उत्साहाने आणि शिस्तीने पार पडेल, अशी अपेक्षा आहे.






