महाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरमध्ये मोबाइल मेडिकल युनिट्सद्वारे मोफत आरोग्य सेवा सुरू

सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत दोन लाख नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्यसेवा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरातील दुर्लक्षित भागांतील नागरिकांसाठी एक दिलासादायक आरोग्य सेवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी सॅनोफी इंडिया लिमिटेड, नागपूर महानगरपालिका आणि पिरामल स्वास्थ्य व्यवस्थापन व संशोधन संस्था (पीएसएमआरआय) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार होऊन दोन मोबाइल मेडिकल युनिट्स (एमएमयू) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

हा उपक्रम सॅनोफीच्या सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी -सीएसआर) कार्यक्रमांतर्गत राबविला जात आहे. नागपूरमधील 30 वर्षांवरील सुमारे दोन लाख नागरिकांना या माध्यमातून मोफत प्राथमिक आरोग्यसेवा मिळणार आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब व तोंडाचा कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करून आवश्यक उपचार अथवा पुढील रुग्णालयीन सेवेसाठी रुग्णांना पाठविणे हे या युनिट्सचे मुख्य उद्दिष्ट आहे.

ही मोबाइल युनिट्स शहरातील आझाद कॉलनी, बडा ताज, बीडी पेठ, बिनाकी, छोटा जात, धंतेश्वरी नगर, धरम पेठ, डॉ. आंबेडकर नगर, एकात्मता नगर, गिट्टीखदान, गोपाल नगर, जैताळा, जयंती नगर, महात्मा फुले चौक, नंदनवन, पाचपोळी आदी विविध भागातील मार्गावर कार्यरत असून, नागरी गरीब व वंचित समाजघटकांपर्यंत सातत्याने आरोग्यसेवा पोहोचवली जात आहे. यासोबतच आरोग्य विषयक जनजागृती, जीवनशैली सुधारणा आणि व्यसनमुक्ती सल्ला सेवा यांचा समावेश देखील या उपक्रमात करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या ‘सर्वांसाठी आरोग्य’ या ध्येयाशी सुसंगत

हा उपक्रम राज्य शासनाच्या  सर्वसमावेशक व सुलभ आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून, नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्यामुळेच या सेवांची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली आहे. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासनासोबत अधिक सघन सहकार्य करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!