महाराष्ट्रमुंबई
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवराय पुतळा परिसरात भव्य आरमार संग्रहालयासह प्रदर्शन,पर्यटन केंद्र उभारणार -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : ‘भारतीय नौदलाचे जनक’ छत्रपती शिवाजी महाराजांचं धैर्य, शौर्य, पराक्रम, अलौकिक कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी. महाराजांनी देशातलं पहिलं आरमार स्थापन करुन दाखवलेली दूरदृष्टी सर्वांना कळावी. त्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढी नौदल, नौवहनसेवेत यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा 83 फुट उंचीचा भव्य पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला आहे. आता त्याच परिसरात शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारं भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, मत्स्यव्यवसाय तथा बंदरविकासमंत्री नितेश राणे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 83 फुट उंच पुतळ्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या राजकोट किल्ल्याला वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. हा किल्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या भविष्यात वाढू शकते. या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळात स्थापन केलेल्या आरमाराचा इतिहास कळावा. माहिती मिळावी. छत्रपतींच्या आरमारापासून आजच्या आधुनिक नौदलाच्या प्रवासाचं दर्शन घडावं, यासाठी राजकोट किल्ला परिसरात भव्य आरमार-नौदल संग्रहालय उभं राहण्यासह परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीनं विकास करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं यासंबंधीच्या प्रस्तावाचा अभ्यास करुन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. सदर प्रकल्पासाठीची जागा खाजगी व्यक्तीकडून अधिग्रहीत करण्याची कार्यवाही चर्चेतून, सामोपचारांनं पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मत्स्यव्यवसाय व बंदरविकासमंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पामागची भूमिका विशद करुन सविस्तर माहिती दिली.