महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात मान्सून सक्रिय होणार असून, आजपासून पावसाची तीव्रता वाढणार आहे. यात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात 12 ते 14 जून दरम्यान मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तामिळनाडू किनारपट्टी ते दक्षिण मध्य महाराष्ट्र पर्यंत हवेचा ट्रफ पसरला आहे. याशिवाय उत्तर ओरिसा आणि लगतच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती असून, हे क्षेत्र हळूहळू महाराष्ट्राकडे सरकणार आहे. याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा मारा होणार असून, मान्सून सक्रिय होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज असून, विशेषकरून गुरुवारी सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, शुक्रवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा घाट क्षेत्र, शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे घाट परिसरात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान कोकण आणि गोवा किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने सतर्कतेचा सूचना देण्यात आली आहे.