अहमदाबाद-लंडन विमान अपघात: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडून तीव्र शोकसंवेदना व्यक्त
मुंबई : अहमदाबाद-लंडन विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृत आणि नातेवाईंकांप्रति संवेदना प्रकट केली आहे. अनेकांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले आहेत. काळाने घातलेली ही झडप अनेक कुटुंबियांसाठी शब्दांच्या पलिकडली आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. या सगळ्यांच्या दुःखात आम्ही सर्व, महाराष्ट्राची जनता सहभागी आहे. त्यांना या दुःखद आघातातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, अहमदाबाद-लंडन या विमानाची झेप ही अनेकांसाठी अंतिम ठरली. रहिवासी परिसरात हा अपघात झाल्याने या अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताने देश दुःखात बुडला असून, विमानातील प्रवाशी, विमानातील अधिकारी-कर्मचारी, अपघातग्रस्त परिसरातील नागरिक यांच्या कुटुंबियांच्या दुःखाला पारावर राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन, तातडीने संबंधित यंत्रणांना निर्देशित केले आहे.
या कठीण प्रसंगात महाराष्ट्रातील नागरिक, आमच्या सर्व यंत्रणा गुजरातमधील शासन-प्रशासनासोबत ठामपणे उभे आहोत. या आपत्तीच्या काळात अपघातग्रस्त परिसरासह, प्रवाशी आणि जखमींसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सक्रीय सहभाग देण्यात येत आहे. अपघातातील जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी तसेच संबंधितांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी यंत्रणांना निर्देशित करण्यात आले आहे. वाहतुकीच्या सुविधांसाठी, वैद्यकीय उपचार आणि अनुषंगिक उपाययोजनांबाबत सज्जता ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त
आज दुपारी गुजरातमध्ये घडलेला भीषण विमान अपघात अत्यंत वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. या अपघाताच्या दुर्घटनास्थळावरून जे दृश्य समोर येत आहेत, ते पाहून काळजाचं पाणी होतं. या अपघातात विमानातील दोन महाराष्ट्रीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्या सर्व प्रवाशांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
ज्या परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्यावर कठीण प्रसंग ओढवला आहे. मी माझी सहवेदनाही व्यक्त करतो. त्यांच्या दुःखात महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सहभागी आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हटतात की, गुजरात सरकार, केंद्र आणि राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी तत्परतेने बचावकार्य सुरू केले आहे. या अपघातातील जखमी प्रवाशांवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्या सर्वांना उत्तम उपचार मिळावेत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
या अपघातामुळे अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात केवळ जीवितहानीच नव्हे, तर मोठं नुकसान झालं आहे. अनेक नागरिकांचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं आहे. विमान कोसळलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली होती, जी विझवण्यासाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे.
या कठीण प्रसंगी आम्ही सगळे गुजरात शासनासोबत असून महाराष्ट्र शासन आवश्यक ती सर्व मदत करेल आपत्तीच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन मदतीचा हात देणं आवश्यक आहे. या दु:खद घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखावर मात करण्याची शक्ती लाभो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.
उपमुख्यमंत्री अजित पवारकडून शोक व्यक्त
गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यूधक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अहमदाबाद शहरातील या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दु:खी असून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रत्येक महाराष्ट्रवासी सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळेत अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळलं. ती संपूर्ण दुर्घटना धक्कादायक, क्लेशदायक होती. गुजरात पोलिस, अग्निशमन, अॅम्ब्युलन्स सेवा, वैद्यकीय पथकांनी, सुरक्षादलांनी दुर्घटनास्थळी पोहचून तातडीने बचाव व मदतकार्य राबवलं. परंतु झालेली जीवितहानी खूप मोठी असून ती भरुन निघणार नाही. अपघाताचं निश्चित कारण अद्याप कळलं नसलं तरी चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमान दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची संपूर्ण माहिती घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गुजरातला पाठवले आहे. या दुर्घटनेच्या निमित्तानं विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचे पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, अकोला, बुलडाणा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले कार्यक्रम साध्या पद्धतीने घेत दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.