महाराष्ट्रमनोरंजनमुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरीला ‘पीएसयू लीडरशीप अँड एक्सेलन्स’ पुरस्कार जाहीर

चित्रनगरीच्या ‘एक खिडकी प्रणाली’साठी दिल्लीत होणार सन्मान

मुंबई : चित्रीकरणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एका ठिकाणी मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने उपलब्ध करून दिलेल्या ‘एक खिडकी प्रणाली’करिता ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वतीने महामंडळास ‘इटी पीएसयू लीडरशीप अँड एक्सेलन्स’ पुरस्कार जाहीर झाला आहे. १९ जून रोजी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यात महामंडळास या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

राज्यात आणि केंद्रात उत्तम सार्वजनिक सुविधा प्रदान करणाऱ्या शासकीय संस्थांना ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वतीने ‘इटी पीएसयू लीडरशीप अँड एक्सेलन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा पुरस्काराचा हा मान दादासाहेब फाळके चित्रनगरीला मिळाला आहे. महामंडळाकडून २०१८ पासून राबविण्यात येत असलेल्या ‘एक खिडकी प्रणाली’च्या यशाकरिता महामंडळास या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरीद्वारे मालिका-चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या चित्रपट निर्मितीसंस्थांना जलदगतीने आणि एकाच ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने २०१८ साली ‘एक खिडकी प्रणाली’ सुरू करण्यात आली होती. या प्रणालीद्वारे चित्रीकरणासाठी लागणारी परवानगी प्रक्रिया जलद आणि सहज पद्धतीने करता येते. या प्रणालीमुळे मालिका, जाहिरातपट, माहितीपट, चित्रपट इत्यादींच्या चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या सुलभ रीतीने आणि ठरावीक मुदतीमध्ये मिळणे शक्य झाले आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली या वर्षी मार्च महिन्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने अद्ययावत करण्यात आली आहे. पूर्वी महाराष्ट्रातील कोणत्याही स्थळासाठी चित्रीकरण परवानगी घ्यायची असल्यास संबंधित विभागांना भेट देऊन परवानगी मिळवावी लागत असे. यामध्ये निर्माते आणि चित्रकर्मींचा बराच वेळ खर्ची होत असे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’ अंतर्गत ‘एक खिडकी प्रणाली २.०’ ही अद्ययावत सुविधा निर्माण केली आहे. याशिवाय, चित्रीकरणासाठी विविध विभागांतर्गत उपलब्ध असलेल्या चित्रीकरण स्थळांची माहितीही या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून चित्रपट निर्मात्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीची विशेष दखल घेत इकॉनॉमिक टाइम्सने ‘ईटी पीएसयू लीडरशीप अँड एक्सेलन्स’ या पुरस्कारासाठी त्याची निवड केली आहे.

देशभरात उत्तम सार्वजनिक सुविधा पुरवणाऱ्या शासकीय-निमशासकीय संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. ‘एक खिडकी प्रणाली’च्या माध्यमातून चित्रनगरीने चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानग्यांबाबत उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत व्यवस्थापन सुविधेची दखल घेत यंदा ‘इटी पीएसयू लीडरशीप अँड एक्सेलन्स’ पुरस्कारासाठी या प्रणालीची निवड करण्यात आल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने नमूद केले आहे. राजधानी दिल्लीमध्ये १९ जून २०२५ रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके चित्रनगरीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

“आधी मुंबई महानगर प्रदेशापुरती मर्यादित असणाऱ्या या ‘एक खिडकी प्रणाली’चा मार्च महिन्यात विस्तार करण्यात आला आहे. यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रभरातील कोणत्याही स्थळी चित्रीकरणासाठी आवश्यक असणार्‍या विविध विभागांच्या परवानग्या या प्रणालीमुळे निर्मितीसंस्थांना सुलभपणे मिळताहेत. याचा मराठी आणि हिंदी, तसेच अन्य भाषांतीलही निर्मितीसंस्थांना लाभ होत आहे. याद्वारे राज्यात चित्रपटनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.”

स्वाती म्हसे-पाटील,
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!