मुंबईशैक्षणिक

शालेय विद्यार्थाना आता पहिली पासून एन सी सी प्रशिक्षण देणार-शिक्षण मंत्री दादा भुसे

मुंबई, दि. 6 : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

 

मुलांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण अथवा एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस मंत्री भुसे यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या या बैठकीत एनसीसीचा राज्यातील विस्तार, प्रशिक्षणाचे स्वरुप, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आदींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, एनसीसीचे संचालक जेनिष जॉर्ज, कर्नल संतोष घाग, लेफ्टनंट कर्नल अजय भोसले आदी उपस्थित होते.

 

मंत्री भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी आदर निर्माण होण्याच्या दृष्टीने यावर्षी स्वातंत्र्यदिन समारंभात देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर केल्या जाणार आहेत. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण मिळावे याअनुषंगाने राज्यातील एनसीसीची प्रशिक्षण केंद्र वाढवून मिळावीत तसेच अधिक शाळांमधील विद्यार्थी त्यात सहभागी व्हावेत, यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीने माजी सैनिकांची देखील मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

एनसीसीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज्यातील एनसीसीची केंद्रे, प्रशिक्षकांची संख्या, प्रशिक्षणाचे स्वरुप आदींची माहिती दिली. सध्या राज्यात सात ग्रुप्स आणि 63 युनिट्स असून यात 1,726 शाळा, महाविद्यालयांतील एक लाख 14 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याचे सांगितले. लवकरच यातील 10 केंद्रांचा विस्तार होऊन यात अधिकचे 20,314 विद्यार्थी जोडले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात शासनाकडून एनसीसीला चांगले सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!