मुंबईत कंपनीत गॅस गळती; 25 महिला कामगार बेशुद्ध
मुंबई : नवी मुंबईच्या तुर्भेतील एका कंपनीत गॅस गळतीची घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे कंपनीतील २५ महिला कामगार बेशुद्ध झाल्या. कंपनीतील अनेकांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम झाला आहे. या घटनेनंतर बेशुद्ध झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल केले आहे. या कंपनीतील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तुर्भे येथील एका कंपनीत गॅस गळतीची घटना घडली. तुर्भेतील एमआयडीसी भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरजवळील डी-३२६ क्रमांकाच्या औद्योगिक युनिटमध्ये ही गंभीर घटना घडली. गॅस गळतीमुळे कंपनीतील महिला कामगारांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तर काहींचं डोके दुखू लागले. गॅस गळतीनंतर काही क्षणात तब्बल २० ते २५ महिला कामगार बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळल्या. कंपनीतील २७ जणांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम झाला. या लोकांना पुढील उपचारासाठी एमजीएममध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीवरून समजते की, तुर्भेच्या एमआयडीसीमधील एका युनिटमध्ये वापरला जाणारा रासायनिक प्रक्रियेमधून कार्बन मोनॉक्साईड (CO) वायू गळती झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीतील एकूण २७ जणांवर या विषारी वायूचा परिणाम झाला. या कंपनीतील कामगारांना तात्काळ वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.