महाराष्ट्र

मुंबईतील रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्याने दिले दोन वर्षाच्या मुलाला चुकीचे इंजेक्शन, मुलाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई :- अल्पवयीन सफाई कर्मचारी असलेल्या महिला कर्मचाऱ्याने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये घडली आहे. ताह आजम खान असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून संतापजनक बाब म्हणजे दोन वर्षाच्या चिमुरड्यला नर्सिंग होमधील १६ वर्षांच्या सफाईकाम करणाऱ्या मुलीने इंजेक्शन दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अल्ताफ अब्दुल हसन खान व्यवस्थापक नसिमुद्दीन सय्यद, परिचारिका सलीम ऊंनीसा खान आणि त्या अल्पवयीन सफाई कर्मचारी मुलीवर गुन्हा नोंदविला आहे.

ताह खान या चिमुरड्याला उलट्या, जुलाबांचा त्रास होत असल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी जवळच्याच नूर रुग्णालयमध्ये ११ जानेवारीला दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देत असताना रुग्णालयातील नर्सने सफाई काम करणाऱ्या मुलीला १६ वर्षांच्या रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी सांगितले होते. या मुलीने इंजेक्शन दोन वर्षांच्या ताह याला दिले. एक इंजेक्शन सलाइनमधून दिले तर दुसरे थेट टोचले आणि काही वेळातच ताह याचा मृत्यू झाला. मुलाला दिलेले इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवले आणि पोलिसांनी तपास केला असता त्यात हलगर्जीपणा समोर आल्याने शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चारही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. मात्र हे रुग्णालय अजून ही सुरूच आहे. या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तर पोलीस या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजन यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!