रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना निधी प्राप्त; मंत्री उदय सामंत ह्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०२१-२२ मध्ये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत रत्नागिरी तालुक्याला ५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून ह्या निधीमुळे रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन स्थळांचे रूप बदलणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मंत्री उदय सामंत ह्यांच्या प्रयत्नांतून मंत्रालयस्तरावर बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्याकडे सदर निधी मिळण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत ह्यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.
प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीपैकी रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील रत्नदुर्ग किल्ला येथील उद्यानात शिवसृष्टी विकसित करण्यासाठी २ कोटी, भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी व परिसर विकसित करण्यासाठी १ कोटी तसेच आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी व परिसर विकसित करण्यासाठी १ कोटी तसेच श्री क्षेत्र पावस येथील परिसरातील विकास कामांसाठी १ कोटी असा वितरित करण्यात आला असून ह्या निधीमुळे ही पर्यटनस्थळे विकसित करण्यास मदत होणार आहे.