सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार…!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशन, मुंबईच्या वतीने कोकण विभागासाठी दिला जाणारा वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळाला आहे.
सन २०२३-२०२४ या वर्षासाठी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कासम केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या संस्थेमार्फत राज्यातल्या जिल्हा सहकारी बँकांना दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार मानला जातो. जिल्हा बँकेने ३१मार्च, २०२४ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत ठेवला. ठेवी, कर्ज,एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्ज वसुली, ढोबळ व निव्वळ नफा, यामध्ये बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे.
बँकेच्या या यशस्वी वाटचालीत बँकेच्या सभासद संस्था,सर्वसामान्य खातेदार, बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी या सर्वांचा महत्वाचा व मोठा सहभाग आहे. बँकेचे कर्जदार, ठेवीदार, ग्राहकांचा या बँकेवरील अतूट विश्वास, कर्जदारांनी कर्ज परत फेडीसाठी केलेले सहकार्य यामुळेच बँक आर्थिक प्रगती करू शकली. दरम्यान बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि बँकेचे ‘सीईओ ‘प्रमोद गावडे यांनी बँकेशी संलग्न सर्वसंबंधित घटकांचे आभार व्यक्त केले असून बँकेच्या पुढील वाटचालीत सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व विश्वास व्यक्त केला आहे.