महाराष्ट्रमुंबई

कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपा पक्षात प्रवेश देणार का ?: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई :  भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने पक्षप्रवेश दिला. आता भाजपा दाऊदला पक्षात प्रवेश देणार का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कोणाला पक्षप्रवेश द्यावा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु हिंदुत्वाच्या गप्पा मारताना आपण काय करत आहोत, याचे भानही भाजपाला राहिले नाही. भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांनी दाऊदचा गुंड सलीम कुत्तासाठी पार्टी दिली होती असा गंभीर आरोप केला. पार्टीत नाचतानाचे त्याचे फोटो विधानसभेत दाखवून कारवाईची मागणी केली होती आणि आता मात्र त्यांनी हिंदुत्व मान्य केले, त्यांचे स्वागतच आहे असे म्हटले आहे. याचा अर्थ उद्या दाऊदला पक्षप्रवेश देऊन त्याने हिंदुत्व मान्य केले असेच म्हणणार का? भाजपा हा ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ म्हणवतो पण आज या पक्षात गुंड, मवाली, भ्रष्टाचारी यांचा भरणा झाला आहे. मुंबईतील ११९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी व दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्याशी संपत्ती व्यवहार प्रकरणी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी भाजपा सत्तेत भागिदारी करतो. प्रफुल्ल पटेलांना वॅाशिंग मशीनमध्ये धुऊन स्वच्छ करतो. भाजपाचे हिंदुत्व बेगडी आहे, हे आम्ही सातत्याने सांगतो तेच आजही दिसले असेही सपकाळ म्हणाले.

सुधाकर बडगुजर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्षांनाही दुपार पर्यंत माहित नव्हते. पण पक्ष प्रवेशाला यावे लागले यावरून भाजपा पक्ष नक्की कोण चालवतो, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!