महाराष्ट्रमुंबई

मराठी भाषा व संस्कृती संपवण्यासाठीच हिंदीची सक्ती, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडा हाणून पाडू: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई :  महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपाला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. या हिंदी सक्तीला काँग्रेसचा विरोध असून कोणत्याही परिस्थितीत राज्यात हिंदीची सक्ती लादू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

टिळक भवन येथील पत्रकार परिषेदत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, याआधी हिंदी सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला होता व हिंदी सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सक्ती करणार नाही सरकारने जाहीर केले होते पण आता दि. १७ जून २०२५ रोजी जो शासन आदेश जारी केला आहे त्यात केवळ शब्दछल करून हिंदी सक्ती ठेवली आहे, हा देवेंद्र फडणवीस यांचा कावा सर्वांना समजला आहे. केवळ शब्द बदलल्याने त्याचा आशय बदलत नाही. मराठी ही केवळ भाषा नसून ती आमची संस्कृती आहे, ही संस्कृती संपवण्याचा अजेंडा रा. स्व. संघ व भाजपाचा आहे. हिंदू, हिंदी आणि हिंदूराष्ट्र हे गोवलकरांच्या बंच ऑफ थॉट मध्ये आहे, तोच फडणवीस राबवित आहेत पण हे षडयंत्र हाणून पाडू असे सपकाळ म्हणाले.

भाजपाशासित गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर मग महाराष्ट्रातच ती का केली जात आहे. गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती का नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींना विचारावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य विरुद्ध भाजपाचा हिंदुराष्ट्र असा हा लढा असून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याबरोबर आहोत. हिंदी सक्तीचा आता कडलोट करावा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

आता माफिया दाऊद इब्राहिमचाच भाजपा प्रवेश बाकी…
नाशिकचे सुधाकर बडगुजर यांचे संबंध कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी आहेत त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत जाहीर केले होते आणि आता त्याच बडगुजरला भाजपाने पायघड्या घालून स्वागत केले. आधी इक्बाल मिर्चीशी संबंधित नेत्याच्या पक्षाला सत्तेत घेऊन मिरची गोड करून घेतली व आता कुत्ताशी सोयरिक केली आहे. आता फक्त दाऊद इब्राहिमलाच भाजपात प्रवेश देणे बाकी आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!