ब्रेकिंग

सर्व शाळा,कॉलेजाना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस देणार इशारापत्र !

मुंबई.दि.२६: कोरोना महामारीच्या संकटात आर्थिक परिस्थती ढासळलेल्या पालकांना आणि पाल्याना दिलासा देण्यासाठी सुरुवातीपासूनच ठाम आणि आक्रमक राहिलेल्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आता केजी टू पीजी अर्थात शाळा, कॉलेजांनी नवीन शैक्षणिक वर्षात आपल्या शिक्षण शुल्क /फी वसुलीत ५० टक्के कपात करावी, असे इशारा वजा मागणी पत्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे सर्व शाळा व कॉलेजांना देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ऍड अमोल मातेले यांच्या अध्यक्षतेखाली रविवार २३ मे रोजी मुंबईतील जिल्हा, तालुका, वॉर्ड स्तरावरील पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा तसेच शाळा, कॉलेज व्यस्थापनाला एक इशारापत्र देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या इशारा पत्रात शाळा,कॉलेजांनी कोरोनामुळे पालकांवर ओढवलेल्या आर्थिक संकटात ५० टक्के फी कमी करावी, अशी आग्रही मागणी करण्यात येणार आहे.

या मागणीवर शाळा,कॉलेजांनी अंमल न केल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते ऍड अमोल मातेले यांनी सांगितले. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने कोरोना काळात अवाजवी फी वसुली करणाऱ्या खासगी शाळांच्या विरोधात निर्णय दिला होता. शिक्षण शुल्कात १५ टक्के कपात करण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले होते. परंतु ही फी १५ टक्के नव्हे, तर ५० टक्के कपात करून महाराष्ट्र राज्यातील शाळा, कॉलेजांनी आकारावी. कोरोना काळात असंख्य पालकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. अनेकांचे उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत अशा परिस्थितीत आभासी ऑनलाइन शिक्षण देण्याच्या नावाखाली अवास्तव, अतिरिक्त फी वसुली करू नये, याकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने लक्ष वेधले होते. इतकेच नाहीतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देखील दिले होते. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांची ऍड अमोल मातेले यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. या भेटीत खासगी शाळा, कॉलेजची फी ५० टक्के कमी करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. तसेच या मागणीवर विचार न झाल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सरकारविरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला होता. यासंदर्भात जयंत पाटील यांनी मी देखील तुमच्या आंदोलनात उतरेन, असे वचन दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!