मुंबई जिल्हा बँकेच्यावतीने स्वयंपुनर्विकासावर मार्गदर्शन शिबीर; प्रविण दरेकरांच्या हस्ते होणार उदघाटन

मुंबई – खासगी विकासकाच्या भरवश्यावर न राहता स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मुंबई सहकारी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दिनांक २२ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता ग्रॅण्ट रोड येथील बालक वृंद एज्यूकेशन सोसायटी, सुदत्ता हायस्कुल येथे ‘स्वयंपुनर्विकास’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे असणार आहेत. या कार्यक्रमाला मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष अनिल गजरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर या शिबिरात स्वयंपुनर्विकास प्रक्रिया आणि अंमलबजावणी या विषयावर हर्षद मोरे, बँक स्वयंपुनर्विकास कर्ज धोरण या विषयावर उदय दळवी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर घनश्याम सोमपुरा हे नंदादीप हौसिंग सोसायटीस स्वयंपुनर्विकासातून आलेला अनुभव सांगणार आहेत. शिबिरात सहभागी होणाऱ्या सोसायट्यांना स्वयंपुनर्विकासासाठी कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक बाबींची सखोल माहिती दिली जाणार आहे.




