कोंकण

Breaking: रत्नागिरी जिल्ह्यात आठ दिवस कडक निर्बंध

सर्व आस्थापना बंदिसह जिल्ह्याच्या सीमा बंद.

रत्नागिरी दि. ३१:: ब्रेक द चेन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात दोन ते आठ जून या कालावधीत वैद्यकीय सेवा सोडून इतर सर्व आस्थापना पूर्ण वेळ बंद ठेवण्यास सह जिल्हा प्रवेश बंदी करण्याचे निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.

शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग (World Pandemic) घोषित केला असून, शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उपरोक्त संदर्भ अ.क्र.1 चे अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020” प्रसिध्द केले आहेत, व त्यास अनुसरुन राज्य शासनाने निर्बंध जारी केले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. तरी सदरचे प्रतिबंध लागू करुनही रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कोव्हीड-19 रुग्णांच्या पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 20% असून 67% च्या वरती ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्याप्त आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्ह्यातील सदयपरीस्थिती विचारात घेता, रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने, दिनांक 02 जून, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजेपासून ते दिनांक 08 जून, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत..

1. मेडीकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा, व आरोग्य विषयक आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे दुकान / आस्थापना पुर्णत: बंद राहतील. दुध व किराणा मालाची दुकाने यांना *केवळ घरपोच सेवा* सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत पुरविता येईल.

2. रत्नागिरी *जिल्ह्याच्या सिमा अन्य जिल्ह्यातून प्रवेश करणेस किंवा अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस बंद करणेत येत आहेत*. तथापि, केवळ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी, वैदयकिय उपचारासाठी, व कोव्हीड-19 व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या / आणिबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणेस किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस मुभा राहील. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोव्हीड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

3. मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. तथापि, अशी मालवाहतुक केवळ दुकानापर्यंत / आस्थापनेपर्यंत माल वितरण करणेपुरती मर्यादित राहील. कोणत्याही ग्राहकास थेट माल पुरविता येणार नाही. याबाबत शर्तभंग आढळल्यास अशा मालवाहतुकदाराची सेवा कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत बंद करणेत येईल.

4. *शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषी विषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या काळात सुरु ठेवणेस मुभा राहील.*

सदरचा आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) लागू राहील. आदेशाची अंमलबजावणी दिनांक 02 जून, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजले पासून ते दिनांक 08 जून, 2021 रोजीचे सकाळी 07.00 वाजेपर्यंत अंमलात राहील असे आदेशात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!