ट्रेन पकडायला धावल्यासारखे विमान पकडायला रन वे वर धावला आणि तुरुंगात जाऊन बसला…
मुंबई : एसटी पकडतात तशी विमान चुकले म्हणून विमान पकडायला एक इसम रनवेवर विमानाच्या मागून धावत गेला शेवटी त्याला तुरुंगात जायची पाळी आली आहे.
मुंबई विमानतळावर हा हा विचित्र प्रकार घडला. एका २५ वर्षीय व्यक्तीने सुरक्षारक्षकांना चकवून विमानतळाच्या रनवेवरुन विमानात चढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विमानतळावरील पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली. तो ज्या विमानाने प्रवास करणार होता. त्या विमानाचे उड्डाण झाले असे त्याला वाटले. तेव्हा घाबरुन रनवेवर पळत विमानात चढण्याचा त्याने प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीयुष सोनी असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो कळंबोलीचा रहिवासी आहे. पीयुष सकाळी ९.५० नंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. तो एअर इंडियाच्या विमानाने पाटण्याला चालला होता. पण त्याच्या विमानाची बोर्डिंग डेडलाइन चुकली. विमान आधीच उड्डाण घेत असल्याचे समजताच पीयुष घाबरला. त्याने रनवेवर जात विमानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण तो ज्या विमानाच्या दिशेने धावत होता, ते विमान गुजरातमधील भूज येथून आले होते. पीयुष सोनीने गेट ४२ आणि गेट ४३ दरम्यानचा आपत्कालीन गेट जबरदस्तीने उघडून विमान पार्क करण्यात आलेल्या उच्च-सुरक्षा क्षेत्र असलेल्या एप्रनमध्ये प्रवेश केला. टायरिंगच्या वेळी पीयुष सोनी अचानक धावत आल्याने ग्राउंड स्टाफमधील अधिकारी घाबरले. सुदैवाने त्यावेळी कोणतेही विमान उड्डाण किंवा लैंडिंग करत नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.