उद्धव ठाकरे यांच्याशी अजूनही चांगले संबंध, त्यांचे आजही मला फोन येतात – संजय राठोड यांच्या वक्तव्याची चर्चा
मुंबई : संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही. मी तुम्हाला नापास करेल. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे आजही चांगले संबंध, त्यांचे आजही मला फोन येतात, असा खळबळजनक दावा राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी केला आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणी गंभीर आरोप झाल्यानंतर राजीनामा घेण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते. त्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर संजय राठोड यांनी आपली नाराजी दर्शवत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. त्यानंतर उदयास आलेल्या महायुतीमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपदही मिळाले. मात्र शिवसेना शिंदे गटात गेल्यापासून उद्धव ठाकरेशी आमदारांचा संवाद संपुष्टात आल्याचं दिसून आलं. मात्र, संजय राठोड यांनी आज खळबळजनक दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत…
राज्यातील फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडताना त्यांच्या प्रगतीचे पुस्तक जाहीर केले. त्यात, संजय राठोड हे नापास असल्याचे सांगण्यात आले, त्यावरुन मंत्री राठोड चांगलेच नाराज असल्याचे स्पष्ट झाल. मंत्रिमंडळाचे प्रगतीपुस्तक काढले आणि प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास दाखवले. पण मी कधी परीक्षा दिली नाही आणि कुणी पेपरही तपासले नाहीत. मग मी नापास कसा झालो? असे वक्तव्य जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेडमध्ये संवाद मेळाव्यात बोलताना केले. बाजारा समाजाच्या संवाद बैठकीत राठोड यांनी बंजारा भाषेत तुफान फटकेबाजी केली. मी एकनाथ शिंदे यांना उठून सांगितले, संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही. मी तुम्हाला नापास करेल. मी तुम्हाला गोष्ट सांगत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत आणि मला उद्धव ठाकरे यांचे फोन सुद्धा येतात, असा खळबळजनक दावाही संजय राठोड यांनी पुढे बोलताना केला.