कोकण आणि विदर्भात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा!

मुंबई : राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर पावसाने जोर वाढला आहे. कोकणात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्या तुलनेत विदर्भात फारसा पाऊस पडलेला नाही. पुढील पाच दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. अधूनमधून हलक्या सरी बरसतात. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 6 मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात 6 मिमी पावसाची नोंद झाली.