वीणाताई गावडे आणि योगेश वसंत त्रिवेदी यांना एनयुजेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार
एनयुजे महाराष्ट्र अधिवेशन व गौरव सोहळ्यात विविध मान्यवरांचा होणार गौरव!

मुंबई: – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माजी वरिष्ठ सहाय्यक संचालक वीणाताई गावडे यांना नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र हा पहिला जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी एका शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा व निमंत्रक शितल करदेकर यांनी सांगितले.
एनयुजे इंडिया नवी दिल्ली संलग्न व आयएफजे, ब्रुसेल्स सदस्य नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्रचे राज्यस्तरीय अधिवेशन व गौरव सोहळा शुक्रवार, २४ डिसेंबर २०२१ रोजी सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर (पूर्व) येथे सकाळी १०:३० ते दुपारी १ या दरम्यान संपन्न होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होत आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ‘सामना’ चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत हे असतील. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे सांस्कृतिक कार्य,आरोग्य राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर हे आहेत. अधिवेशनात पत्रकारांसह, जनसंपर्क तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकीतून लोकशाही बळकटीसाठी सक्षम समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच पत्रकारितेचे अर्थात लोकशाहीचे भविष्य याविषयावर महत्त्वपूर्ण मंथन होणार आहे. तर एनयुजे महाराष्ट्रचा पहिला जीवनगौरव पत्रकारितेसाठी ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी आणि माहिती व जनसंपर्कासाठी वीणाताई गावडे यांना देऊन गौरविण्यात येणार आहे. तर मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर, महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, मुंबई महानगरपालिका आरोग्य समितीच्या सभापती राजुल पटेल यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला मान्यवर नेत्यांसह कलावंतांची लक्षणीय उपस्थिती असणार आहे. अशी माहिती अधिवेशन निमंत्रक एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी दिली. हा कार्यक्रम कोरोना आपात्कालीन निर्बंध नियम पालन करून आयोजित करण्यात येत असल्याचे संघटन सचिव कैलास उदमले व सरचिटणीस सीमा भोईर यांनी आवर्जून सांगितले.