महाराष्ट्रमुंबई

‘मराठी’ तितुका मेळवावा…

संपादकीय

मुंबई (महेश पावसकर) : मराठी भाषेला केंद्र सरकारने अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि तमाम मराठी हृदयात आनंदाचे डोही आनंद तरंग उमटले… हे आनंदाचे तरंग जास्त काळ राहू दिले तर दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र आणि मराठी माणूस डोईजड होईल की काय अशी भिती वाटल्याने म्हणा किंवा मराठी चा सदैव दुस्वास करण्याची उत्तरेकडच्यांची खाज म्हणा, महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमधून तृतीय भाषा म्हणून हिंदीची अलिखित सक्ती करण्याचा आदेश दिल्लीवरून निघाला आणि आज्ञाधारक महाराष्ट्र सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याची कारवाई घाईने सुरू केली. या हिंदी भाषिक सक्तीला महाराष्ट्राच्या सर्वच स्तरातून तीव्र विरोध सुरू झाल्यावर इयत्ता पहिली ते पाचवीसाठी अन्य भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यासाठी केलेली तरतूद असून हिंदीची सक्ती नसल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले.

 हिंदी भाषिक सक्तीला मुंबई सह महाराष्ट्रातून विरोध सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार जागे झाले आणि महाराष्ट्रात मराठीच सक्तीची राहील हिंदी भाषा केवळ ऐच्छीक राहील अशी सारवासारव सुरू केली..महाराष्ट्रात मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस सह राष्ट्रवादी (शप) या पक्षांनी हिंदी भाषिक गळचेपी विरुद्ध तीव्र निषेध नोंदवला.. राज ठाकरे यांनी तर थेट शाळेच्या मुख्याध्यापकांनी हिंदी सक्ती राबवून दाखवावीच मग आम्ही पहातोच.. असा सज्जड दम भरला उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या सुरात सूर मिसळल्याने सरकारची गोची झाली. समोर येऊ घातलेल्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता मराठी अस्मिता आपल्या मुळाशी येऊ शकेल याची जाणीव होताच मग सरकार ने कोलांटी उडी मारून महाराष्ट्रात मराठीच अनिवार्य राहील आणि हिंदी ची सक्ती नसल्याचे जाहीर करून टाकले. तद्नंतर राज ठाकरे – मुख्यमंत्री यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर आपला पूर्वीचा हिंदी ऐच्छिक असण्याचा निर्णय बदलून एका रात्रीत शिक्षण विभागाने शासकीय निर्णया चे शुद्धिपत्रक काढून २० विद्यार्थ्यांची अट पुढे करून मागील दाराने हिंदी च्या सक्तीची तरतूद केली. 

मुळात मुंबई सह महाराष्ट्रात कोणत्याही शाळेत तपासणी केली असता मराठी,हिंदी वगळता इतर कोणत्याही एका भाषेचे एकगठ्ठा २० विद्यार्थी मिळणे अशक्यप्राय असल्याचे माहीत असुनदेखील मानभावी पणे अशी अट घालणे म्हणजे अप्रत्यक्ष रित्या हिंदी ची सक्ती केल्यासारखेच होणार आहे याची जाणीव तथाकथित शिक्षण धुरिणांना नसेल असे समजणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात विहार करण्यासारखे होईल.

सरकारने केलेली ही चलाखी व दांडगाई लक्षात येताच पुन्हा एकदा सर्वत्र सरकारच्या निषेधाचे सूर उमटू लागले. त्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वप्रथम आवाज उठवणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडे शासनाचे दूत म्हणून शिक्षण मंत्री दादा भुसे यांना शेवटचा प्रयत्न म्हणून पाठवण्यात आले. मात्र या वेळी राज बधले नाहीत.

महाराष्ट्रात राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही तमाम मराठी जनांची इच्छा असली तरी टाळी कुणी द्यायची आणि आपण टाळी द्यायला हात वर केला आणि दुसऱ्याने टाळी न देताच हात पाठी घेतला तर? अशी साधार भीती वाटल्याने म्हणा किंवा एकाच म्यानात दोन तलवारी कश्या राहणार ? मग एका पक्षातील कार्यकर्त्यांची घरवापसी होणार की मनसे उबाठा पक्ष हायजॅक करणार असे अनेक प्रश्न छळत असताना सरकारच्या या अलिखित हिंदी सक्ती विरुद्ध राज ठाकरे यांनी 5 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला आणि सर्व मराठी प्रेमी नागरिकांनी आणि सर्व पक्षांनी आपला पक्षीय झेंडा बाजूला ठेवून मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले.  

आता मात्र प्रादेशिक भाषा संपवून संपूर्ण देशभर एक भाषा एक निवडणूक आणि एक पक्ष निर्माण करण्याच्या व्यापक कटाचा हा एक भाग असल्याचा वास या निर्णयामुळे तमाम मराठी भाषिक आणि मराठी वर प्रेम असणाऱ्या सर्वच लोकांना येऊ लागला आहे.

 काही दिवसांपूर्वी मुंबईतील विद्याविहार येथे एका कार्यक्रमात आरएसएसचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी ‘मुंबईत अनेक भाषा बोलल्या जातात जशी घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही’ असं विधान केलं होतं…

आता केवळ महाराष्ट्रात अशा प्रकारची सक्ती करणारे केंद्र सरकार गुजरात, तामिळनाडू आणि अन्य राज्यात हिंदी ची तृतीय भाषा म्हणून अलिखित सक्ती का करीत नाही? शिवाय उत्तरेकडच्या राज्यांमध्ये जिथे हिंदी हीच प्रमुख भाषा आहे अश्या राज्यांमध्ये तृतीय भाषा म्हणून कोणती भाषा शिकवणार याचे कोणतेही उत्तर केंद्र किंवा राज्य सरकारकडे नाही.

“हिंदी मे काम करना आसान है, शुरू तो किजिये” असे लिहिलेले फलक पूर्वी टेलिफोन आणि इतर केंद्रीय कार्यालयातून लागलेले दिसायचे… ते इंग्रजी मधून कामकाज आणि संभाषण करणाऱ्या जनतेसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी असायचे ज्यात इंग्रजी मधून काम करण्यापेक्षा हिंदी मधून काम करण्याचा संदेश दिला जात होता. आश्चर्याची बाब म्हणजे त्या काळी मुंबईसह महाराष्ट्रातील पोस्ट ऑफिस, टेलिफोन आदी कार्यालयांमध्ये मध्ये मराठी माणसांचा भरणा अधिक होता.. हिंदी भाषा अलगद गळी उतरवण्याच्या प्रयोगाचा तो चंचुप्रवेश होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

 भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, पु .ल.देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले,सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, नाना पाटेकर आणि अशी अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे मुंबई आणि महाराष्ट्राने या देशाला दिली आहेत. भारतीय चित्रपट सृष्टी चे जनक दादासाहेब फाळके यांनी तर भारतात चित्रपट निर्मितीची बीजे रोवली, त्यांच्या उपकाराखाली अब्जाधीश रूपयांची उलाढाल करत असलेली भारतातली संपूर्ण सिनेसृष्टी जिला आज बॉलीवूड म्हणून संबोधले जाते त्या सिनेसृष्टीत आज मराठी कलावंतांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. ‘घाटी लोग’ म्हणून हिणवले जाते. मराठी कलाकारांच्या मराठी एक्सेंट ला नाके मुरडली जातात. मात्र या चित्रपट निर्मात्या दिग्दर्शकांना दारासिंग किंवा तत्सम पंजाबी भाषेचा एक्सेंट चालतो.. नव्हे पंजाबी लहेजा असेल तर लगेच घेतले जाते. गुजराती एक्सेंट असेल तरी देखील चालते मग मराठी माणसांचा द्वेष का? याचे उत्तर सोन्याची अंडी देणाऱ्या मुंबई वरील मराठी माणसांचे वर्चस्व हे आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर दुर्दैवाने मराठी माणसाचा धाक या लोकांना राहिला नाही. मग ते राजकारणी असोत वा उद्योगपती. एकेकाळची रांगडी शिवसेना मराठी च्या थोड्या देखील अपमानाने पेटून उठायची ती नेमस्त नेतृत्वाखाली फक्त आणि फक्त भाषणांमधून जहाल व्हायला लागली. प्रत्यक्षात रस्त्यावरचा लढा शून्य…म्हणूनच शिवाजी महाराजांचे गुरू रामदास नसते तर शिवाजी कसे झाले असते? अशी वक्तव्ये जाहीर भाषणांमधून होऊ लागली. क्रांतिसूर्य जोतिबा आणि सावित्री बाई फुले यांच्यावर विनोद होऊ लागले. मात्र सत्तेवर असून देखील वांझोट्या निषेधा पलीकडे बाळासाहेबांची तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मोटारीसमोर झोकून देणाऱ्या शिवसैनिकांसारखी सैनिकांची नवी फळी उभी करता आली नाही हे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे दुर्दैव!

आज मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे तिथे मराठी माणसे केवळ २८% उरली आहेत. मराठी शाळा टप्प्याटप्प्याने बंद पडत आहेत. इंग्रजाळलेल्या शाळांमधून शिकणाऱ्या मराठी मुलांना मराठी साहित्य संपदा आणि महाराष्ट्राची थोर परंपरा याचा विसर पडत चाललेला आहे. अश्या वेळेस इंग्रजी नंतर येऊ घातलेले हिंदी भाषेचे चे हे अतिक्रमण फारच धोकादायक ठरणार आहे. ‘मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत घडावे ही महाराजांची आणि श्रींची इच्छा होती… जिची पायमल्ली होणे हे कोणताही मराठी माणूस सहन करणार नाही त्यामुळे सरकारने हिंदी भाषेसंबंधीत काढलेला शासकीय आदेश आणि त्या वर काढलेले शुद्धिपत्र त्वरीत विसर्जित करावे आणि हिंदी भाषेची लादलेली अलिखित सक्ती रद्द करावी.

संपादक

९९६७९४९३५६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!