महाराष्ट्रमुंबई

येत्या सोमवारपासून बोरीवली पूर्व येथे वसंत व्याख्यानमाला ; मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना पुरस्कार समारंभपूर्वक होणार प्रदान

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सातत्याने गेली ४२ वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यंदाही ४३ व्या वर्षी त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांनी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दि. २८ एप्रिल, मंगळवार, दि. २९ एप्रिल आणि बुधवार दि. ३० एप्रिल २०२५ असे तीन दिवस ही वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. विजय वैद्य यांच्या संकल्पनेप्रमाणे समाजाला बौद्धिक मेजवानी देण्याचा उद्देश कार्यकर्त्यांनी कायम जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत देण्यात येणारे जय महाराष्ट्र नगर भूषण, शारदा आणि प्रेरणा हे तीन पुरस्कार सुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

सोमवार, २८ एप्रिल २०२५ रोजी या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प जीवनविद्या मिशनचे व्याख्याते प्रा. शैलेश रेगे हे ‘मनाचे व्यवस्थापन’ या विषयावर गुंफणार असून मंगळवार, २९ एप्रिल २०२५ रोजी हत्ती मित्र आनंद शिंदे हे ‘एक संवाद हत्तीशी’ या विषयावर अत्यंत वेगळा विषय मांडणार आहेत. सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या बॅंकिंग क्षेत्रातील अडचणी संदर्भात ‌बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी हे ‘आज अर्थव्यवस्थेत आपले उत्पन्न, खर्च, गुंतवणूक व बचत सुरक्षित आहे कां?’ या विषयावर बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी मार्गदर्शन करणार आहेत. एकता विनायक चौक, टाटा संग्राही केंद्रा (टाटा पॉवर हाऊस) समोर, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी ७.३० वाजतां ही वसंत व्याख्यानमाला होणार आहे.  विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या परंपरा, प्रथेप्रमाणे यंदा जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  हेमंत पाटकर यांना, शारदा पुरस्कार आपल्या सुमधूर वाणीने तमाम रसिकांना गेली ४५ वर्षे मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ सुसंवादिनी मंगलाताई खाडिलकर यांना तसेच प्रेरणा पुरस्कार बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या मनमिळावू, मितभाषी अध्यक्षा रुचिराताई दिघे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. ही व्याख्यानमाला विनामूल्य असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून ४३ वर्षांपूर्वी विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा आणि आपापल्या सक्रीय सहकार्याचा हातभार लावावा, असे आवाहन कार्यकर्त्यांच्या वतीने सचिन वगळ आणि  नयना रेगे यांनी केले आहे. विजय वैद्य यांनी सुरु केलेली ही जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यापुढे सुरु ठेवण्यासाठी  वैशाली विजय वैद्य, वैभव विजय वैद्य आणि विक्रांत विजय वैद्य यांनी अनुमती दिली असून त्यांचेही यथोचित सहकार्य लाभणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!