मातृभक्त अर्चना शंभरकर !

मुंबई: केम छो गुरुजी ? मजामां नें ? शुं चाले छे ? अस्खलित गुजराती भाषेतून प्रश्नांची सरबत्ती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय येथील वरिष्ठ सहाय्यक संचालक सौ. अर्चना गाडेकर शंभरकर या सुमारे बारा वर्षे अहमदाबाद येथे कार्यरत होत्या. आताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी हे त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. हा त्यांचा संपूर्ण कार्यकाळ सौ. अर्चना शंभरकर यांनी जवळून पाहिला असल्याने आणि शिकण्याची जिज्ञासा असल्याने त्या अस्खलित गुजराती बोलत होत्या. मुंबई येथे बदली होऊन अर्चना मंत्रालयात आल्या आणि आमचा परिचय झाला. माझ्याबरोबर त्या बहुतेक वेळा गुजरातीमधूनच बोलायच्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मध्ये विभागीय संपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असतांना निवडणुकीच्या काळात त्या मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळतांना या जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय तपशीलवार माहिती, जुने संदर्भ देण्याचे काम अर्चना चोखपणे बजावत. काम करणाऱ्या माणसाची बदली करणे हे तर नित्याचेच. त्यामुळे अर्चना शंभरकर या मंत्रालयातून कधी ठाण्याला, कधी पालघरला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असायच्या. त्यांनी लिखाणाची आवड जोपासतांना गुजरात मधील आपल्या एका तपाच्या कारकीर्दीवर ‘सोलमेट’ नावाची कादंबरी लिहिली. या कादंबरीचे अभिवाचन त्यांनी गोरेगाव येथे आयोजित केले होते आणि मला आवर्जून आमंत्रित केले होते. गोरेगावच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी अणावकर आणि मी या सोलमेटच्या अभिवाचन कार्यक्रमास उपस्थित राहिलो. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमाची बातमी गुजरात समाचार मध्ये तीन स्तंभात दिली. अर्चना जाम खुश झाल्या. गुरुजी आटला मोटा समाचार ? हुं तो एकदम हरखाई गई, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. मी कोरोना च्या काळात पासष्टायन आणि गुरुजी ही दोन पुस्तके लिहिली. ही दोन्ही पुस्तके त्यांना सस्नेह भेट दिली. दोन्ही पुस्तकांची त्यांनी वाखाणणी केली. गुरुजी हे पुस्तक संदर्भासाठी असल्याने त्याचा त्यांनी चांगलाच उपयोग करुन घेतला. इतकेच नव्हे तर त्यांनी एल एल एम ची परीक्षा दिली. मला आवर्जून त्यांनी सांगितले की गुरुजी तुमच्या गुरुजी पुस्तकावरुन मी ही परीक्षा दिली आहे. त्यांनी यावर एक लेख लिहिला अर्थात मी अजून पूर्ण करुन पाठविते असे त्यांनी सांगितले परंतु कर्करोगाशी झुंज देत त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. हा लेख अपूर्णच राहिला. सुस्वभावी, मितभाषी आणि बोलतांना जणू त्यांच्या मुखातून साखर पाझरते की काय इतका गोडवा त्यांच्या स्वभावात होता. त्या खऱ्याखुऱ्या मातृभक्त होत्या. विमल गाडेकर या चंद्रपूर येथील कवयित्री या अर्चना शंभरकर यांच्या मातोश्री. तीनेक वर्षांपूर्वी विमलताई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचे दुःख अर्चनाताईंना मोठ्या प्रमाणावर झाले. अर्थात प्रत्येक व्यक्तीला आई ही प्यारीच असते. परंतु मातृभक्ती ही अर्चना शंभरकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली. एकाच वेळी चंद्रपूर आणि मुंबई येथे ‘विमल दिवस’ हा विमलताईंच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम अर्चना शंभरकर या करीत असत. वडील भगवान गाडेकर, पती प्रकाश, भाऊ डॉ. हेमंत गाडेकर, अभिनेता असलेला भाऊ जयंत गाडेकर आणि डॉ. मोना या भगिनी असा परिवार विमल दिवस साजरा करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतांना पाहिले आहे. कुटुंब रंगलंय काव्यात चे सर्वेसर्वा प्रा. विसुभाऊ बापट, ख्यातनाम गीतकार, लेखक दिग्दर्शक अभिनेते स्वानंद किरकिरे, ज्येष्ठ संपादक शाम पेठकर, अभिनेते भारत गणेशपुरे, रंगकर्मी शिक्षणतज्ज्ञ डॉ. मंगेश बनसोड अशा नामवंतांची मांदियाळी अर्चना शंभरकर यांनी आपल्या या कार्यक्रमात उभी केलेली पहावयास मिळाली. विमलताई गाडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेकांना त्यांनी सन्मानित केले. समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवून देण्याचे महत्कार्य अर्चना शंभरकर यांनी केले आहे. बरं, कोणतेही विधायक कार्य करतांना त्यांनी त्याचा कधी बोभाटा केला नाही. कोकण विभागीय उपसंचालक पदाचा कार्यभार असतांनाच त्यांना कर्करोगाने घेरले. पत्रकारांच्या रत्नागिरी अभ्यास दौऱ्यात अर्चना शंभरकर यांनी उपसंचालक या नात्याने आपली जबाबदारी चोख बजावली. तिथेच कर्करोगाने त्रस्त असूनही चेहऱ्यावर हसू सातत्याने ठेवीत त्यांनी त्रास सहन केला. मंदार पारकर यांनी मला सांगितले की गुरुजी अर्चनाताई कर्करोगाशी सामना करीत आहेत. इच्छा असूनही प्रकृतीच्या कारणास्तव अपोलो पर्यंत जाऊ शकलो नाही. आणि अर्चना शंभरकर यांच्या देहावसानाचे वृत्त कानी पडले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मधील प्रत्येक जण या बातमीने हळहळला. पत्रकारांबरोबर सलोख्याचे संबंध असल्याने मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानेही आदरांजली वाहण्याचे कर्तव्य बजावले. त्या दिवसापासून मन सुन्न झाले. नव्या मुंबई पर्यंत पोहोचू शकलो नाही परंतु अर्चना शंभरकर यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी ही शब्द सुमने अर्पण करणे हे माझे कर्तव्यच ठरते. अर्चना शंभरकर यांच्या अकाली निधनाने एक हसतमुख, मितभाषी आणि आपल्या परिवारातील एक सदस्य, चांगला साहित्यिक आपण गमावला आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि आमचे परमादरणीय मित्र विजय वैद्य यांच्या देहावसानानंतर अर्चना शंभरकर यांनी थोडक्यात आपल्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या, त्या याठिकाणी देणे औचित्यपूर्ण ठरेल. “विजय वैद्य या अफाट व्यक्तीमत्वाला आपण प्रत्यक्ष भेटून संवाद साधू शकलो याचा मला अभिमान वाटला. त्यांच्या सारखे प्रेरणादायी व्यक्ती या आपल्या आसपास आहेत त्यामुळेच आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होत जातो. वैद्य यांचे जाणे हे मनाला चटका लावून गेले. तुमचा लेख वाचून त्यांनी प्रेरित केलेल्या कामांची अधिक माहिती मिळाली . एवढी उर्जा असणारे व्यक्ती सतत त्यांच्या कामातून, त्यांनी तयार केलेल्या कार्यकर्त्यांमधून आपल्याला भेटत राहतील. स्मृतीशेष. विजय वैद्य यांना विनम्र अभिवादन” -अर्चना शंभरकर (२९ सप्टेंबर २०२४). लिहिण्यासारखे खूप आहे पण लेखनसीमा सांभाळणेही आवश्यक आहे. अर्चना शंभरकर गाडेकर यांच्या कार्यकर्तृत्वाला शतशः प्रणाम !
योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)





