तुम्ही शाळा सुरु ठेवा आम्ही काळजी घेतो ; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई – कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे शाळेत जाता येणार नसल्याने निराश झालेल्या सोलापुरातील एका विद्यार्थ्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. आम्ही काळजी घेतो तुम्ही शाळा सुरू ठेवा, अशी विनंती पाचवीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सोलापूर येथील पाचवीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू याने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सरसकट शाळा बंद करू नका, अशी मागणी केली आहे. या विद्यार्थ्याने स्वतःच्या हस्ताक्षरात प्रथमच मराठीतून पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तुम्ही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवत आहात, पण ऑनलाइन शिक्षण खेडयापाडयातील अनेक विद्यार्थ्यांना सोयीसुविधा अभावी घेणे शक्य नाही.
पुढे पत्रात लिहिले आहे की, ‘आमचे शिक्षक अनुभवी आहेत, पण गणित, विज्ञानसारखे विषय शिकविण्यासाठी ऑनलाईनमध्ये मर्यादा पडतात. या विषयांमध्ये आमचा शैक्षणिक पाया मजबूत होत नाही’, असे कौस्तुभने पत्रात म्हटले आहे. आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत, तुम्ही प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असेही त्याने म्हंटले आहे. सध्या या पत्रातील मजकुराची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.