उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे- पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी:- गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे निर्देश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिले आहेत. या महोत्सवांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ असून, ही स्पर्धा विनामूल्य आहे. स्पर्धेचे अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टल द्वारे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय (दूरध्वनी क्रमांक 02352- 222962) येथे संपर्क साधावा.
विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम, गड किल्ले संवर्धन, राज्य व राष्ट्रीय स्मारकांचे जतन, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध विषयांवरील कार्य, कायमस्वरूपी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, जेष्ठ नागरिक वंचित घटक, दिव्यांग अशा विविध समाजघटकांसाठी आयोजित उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या प्रचार व प्रसिद्धीचे कार्य, नवसंशोधन, पर्यावरण पूरक मूर्ती, सजावट व प्रदूषण रहित वातावरण अशा विविध बाबींच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे.
तालुकास्तरीय विजेत्यांना प्रथम क्रमांकास 25 हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे 50 हजार, 40 हजार व 30 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक 7 लाख 50 हजार, द्वितीय 5 लाख व तृतीय क्रमांक 2 लाख 50 हजार रुपये पारितोषिक आहे. विजेत्या गणेशोत्सव मंडळास स्पर्धेतील त्यांनी प्राप्त केलेल्या सर्वोच्च पुरस्काराची रक्कम देण्यात येईल.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांनी त्यांनी केलेल्या कामाचा कालावधी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशी ते चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशी पर्यंतचा असेल. या स्पर्धेतंर्गत भाग घेणाऱ्या मंडळापैकी चालू आर्थिक वर्षाच्या मागील सलग दोन वर्षे राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. ही अट इतर मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने आहे. स्पर्धेच्या परीक्षणासाठी निवड समितीने दिलेल्या दिवशी व वेळी संबंधित कागदपत्रे व माहिती समितीला उपलब्ध करुन देणे ही जबाबदारी संबंधित मंडळाची असेल.