फडणवीसांचा एकनाथ शिंदे यांना पुन्हा दे धक्का – मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदांवर बदल

मुंबई प्रतिनिधी:राज्यातील महत्त्वाच्या मित्रा संस्था (Maharashtra Institution for Transformation) मध्ये उपाध्यक्ष पदांवर मोठे बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारणा करत दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, वादग्रस्त बिल्डर अजय आशर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
शिंदे समर्थक बाहेर, नव्या चेहऱ्यांना संधी
एकनाथ शिंदे यांच्या काळात शिवसेनेचे दोन निकटवर्तीय मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष होते. मात्र, आता फडणवीस यांनी निर्णय घेत तीन नवीन उपाध्यक्षांची निवड केली आहे. विशेषतः, शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि वादग्रस्त बिल्डर अजय आशर यांची उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आशर यांच्याकडे या संस्थेतील महत्त्वाची जबाबदारी होती, मात्र नव्या निर्णयाने त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
नवीन उपाध्यक्षांची निवड
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मात्र आपल्या उपाध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत.
फडणवीसांचा राजकीय डाव?
या बदलांमुळे मित्रा संस्थेवरील शिंदे गटाचा प्रभाव कमी झाला असून, भाजपने आपली पकड मजबूत केली आहे. फडणवीस यांनी एकीकडे भाजप आमदाराची वर्णी लावत आपली ताकद वाढवली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे पाटील यांना संधी देत, नव्या समीकरणांना चालना दिली आहे.
हा निर्णय महायुतीतील सत्ता संघर्षाची झलक असल्याचे बोलले जात आहे. मित्रा संस्थेवरील या नव्या नियुक्त्यांमुळे शिंदे गटाच्या नेतृत्वाला धक्का बसला आहे, तर फडणवीस यांनी आपल्या हातात अधिक नियंत्रण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.