हत्तीण, कबुतर, वाघ यामुळे महायुती सरकारची अवस्था ‘सर्कसी’ प्रमाणे; काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांची उपरोधिक टीका.

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या हत्तीणीच्या प्रश्नाने जनतेच्या दुखावलेल्या भावना, दादरच्या कबुतरांच्या प्रश्नाने प्रदूषित झालेले वातावरण, वांद्र्याच्या वाघाने शिवाजीपार्कवर सुरु केलेला फेरफटका, यासाऱ्या घटना हाताळतांना महायुती सरकारची ‘सर्कस’ झाली आहे.
सर्कसीमध्ये ‘तारेवरची कसरत’, हे एक मोठे आकर्षण असते. कोल्हापुरातील हत्तीण आणि वनतारातील ‘अंबारी’, दोन्ही सांभाळतांना महायुती सरकारचीच तारेवरची कसरत होत आहे.
देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतांनाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवतो तरीही महायुती सरकार ठोस कारवाई करीत नाही. याउलट पुण्यामध्ये गणपती मंडळांवर त्वरित खटले दाखल होतात यातून महायुती सरकारचा दुटप्पीपणा दिसून येतो.
काँग्रेस अल्पसंख्यांकांच्या दबावासमोर झुकते असा कायम प्रचार करणाऱ्या भा. ज. प. ने अल्पसंख्यांकातील एका समुदायाच्या आर्थिक ताकदीपुढे जणू शरणागतीच पत्करली आहे. यातून भा. ज. प. चा दुतोंडी चेहेरा उघड झाला आहे, असेही गाडगीळ यांनी म्हटले आहे.
याशिवाय, सर्कशीमध्ये विदूषकाने विचित्र वक्तव्य करताच रिंग मास्टर त्याला फटका देतो, तेच चित्र राज्यातील मंत्र्यांचे वर्तन व वक्तव्यांनंतर राज्यात दररोज दिसून येत आहे. आतातर बांद्र्याच्या वाघाच्या आसन व्यवस्थेवर ‘सिंहां’सनावर बसलेले प्रतिक्रिया देऊ लागल्यामुळे एकंदरीत महायुती सरकारने स्वतःला ‘लाफ्टर क्लब’च बनविले आहे, अशी टीकाही गाडगीळ यांनी केली आहे.