महाराष्ट्र

कोट्यवधी रुपये खर्च करूनही घाट वाहतुकीस धोकादायक,करूळ घाट आणखी काही दिवस कामामुळे बंद रहाणार!

कोल्हापूर : करूळ घाटात तडा गेलेल्या धोकादायक दरडी काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामात पारंगत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एसएसपीएल कंपनीला पाचारण केले आहे. या कंपनीने शनिवारी सकाळपासून कुशल मनुष्यबळ वापरून दरड काढण्यास सुरुवात केली आहे. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या तज्ज्ञांचे पथक पाहणी करून वाहतूक सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार आहेत. याआधी 12 सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंद करण्याचा घेतलेला निर्णय पुढे आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे.

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात गुरुवारी स. 8 वा. च्या सुमारास गगनबावड्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या यू आकाराच्या वळणात महाकाय दरड कोसळली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यंत्रणेकडून गुरुवारी सकाळपासूनच ही दरड काढण्यासाठी दोन जेसीबी व दगड फोडणारे मशीन लावण्यात आले. मात्र दरठ बाजूला काढत असताना त्या ठिकाणी दरडीला मोठे तडे गेल्याचे दिसून आले. यामुळे दरड पुन्हा कोसळण्याचा धोका असल्याने ही दरड हटविण्यासाठी आणखी पाच- सहा दिवस अवधी अपेक्षित आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना कळवून 12 सप्टेंबरपर्यंत घाटमार्गातील वाहतूक बंद करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यानी सुरक्षिततेच्या कारणास्तव करूळ घाट मार्गातील वाहतूक 12 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तज्ज्ञ कमिटीने संपूर्ण करूळ घाटाची पाहणी करत घाटातील दरडी कोसळण्याची धोका असलेली पाच ठिकाणे निश्चित केली आहेत. तडे गेलेल्या दरडी उंच डोंगरावर असल्यामुळे त्या मशीनच्या सहायाने काढणे काढणे शक्य नाही. त्यामुळे या दरडी काढण्यासाठी कुशल कामगार वापरून काम करणे आवश्यक आहे. तडे गेलेल्या धोकादायक दरडी काढण्यासाठी या कामातील पारंगत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीला पाचारण करण्यात आले आहे. या कंपनीला आसाम,जम्मू काश्मीर अशा ठिकाणी काम करण्याचा अनुभव आहे. त्यांच्याकडून शनिवारी सकाळपासून गुरुवारी पडलेल्या दरडीच्या ठिकाणी तडे गेलेल्या दरडी मनुष्यबळाच्या सहायाने काढण्यात येत आहेत. सुमारे 50 ते 60 फूट उंचीवर दोरखंडाच्या मदतीने चढून कामगार तडे गेलेला दरडीचा भाग पहारीच्या सहायाने काढत आहेत. हे काम अतिशय जोखमीचे असल्यामुळे त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा तज्ज्ञ टीम पाहणी करून वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेणार आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही घाट वाहतुकीस धोकादायक

यापूर्वी 22 जानेवारी 2024 पासून सुमारे 14 महिने करूळ घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करून या संपूर्ण मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले. यामध्ये संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण काँक्रिटीकरण, संरक्षण भिंती, मोरया, आधार भिती अशी कामे करण्यात आली. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र गेल्या वर्षी पहिल्याच पावसात नवीन काँक्रीटीकरण रस्त्यासह संरक्षण भिंत कोसळल्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात होती. रस्त्याचे रुंदीकरण करताना मशीनच्या साहायाने दरडी काढण्यात आल्या. त्यामुळे कमकुवत झालेल्या दरडी कोसळण्याचे सत्र गेल्यावर्षी पासून सुरू आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात मोठया प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. मात्र घाटातील वाहतूक बंद असल्यामुळे त्याची फारशी चर्चा झाली नाही..

धोकादायक तडे गेलेल्या दरडी काढण्याचे काम सुरू आहे. 12 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर सुरक्षितेची खात्री करून वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पवन पाटील, अभियंता- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!