लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट ! भाविकांचे 100 मोबाईल आणि सोन्याच्या चेन लंपास

मुंबई: आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप दिला. मुंबईचा प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे या वर्षीही चर्चेत राहिला. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक शनिवारी सुरू झाली आणि भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत बाप्पाला रविवारी निरोप दिला.
विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट
एकीकडे भक्तीमय वातावरण असतानाच, दुसरीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला काही अप्रिय घटनांमुळे गालबोट लागले. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांना लक्ष्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत १०० हून अधिक मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. अनेक भाविकांनी या संदर्भात कालाचौकी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी आतापर्यंत १० गुन्हे दाखल केले आहेत.
यापैकी चार गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून, चोरीला गेलेले चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे. मोबाईल चोरीसोबतच सोन्याच्या चेन चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. चेन चोरीच्या १२ प्रकरणांमध्ये पोलिसांनी दोन सोन्याच्या चेन जप्त केल्या असून १२ आरोपींना अटक केली आहे.