राज ठाकरेंची अमित शाह-जय शाह यांच्यावर व्यंगचित्रातून टीका

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान आशिया चषक टी-२० सामन्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे चिरंजीव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरून एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे, ज्यात पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना आणि भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा संदर्भ दिला आहे.
व्यंगचित्रात अमित शाह आणि जय शाह यांना पहलगाममध्ये मरण पावलेल्या व्यक्तींकडे पाहताना दाखवण्यात आले आहे. जय शाह मृतदेहांना हात लावून म्हणत आहेत, “अरे बाबांनो उठा! आपण पाकिस्तानच्या विरोधात विजय मिळवला.” अमित शाह यांच्यावर ‘गृह’ तर जय शाह यांच्यावर ‘आयसीसी’ असे लिहल्याचे उल्लेख आहे. पाठीमागे ‘पहलगाम’ अशी पाटीही दाखवण्यात आली आहे. व्यंगचित्रात “नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं?” असा खोचक सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राद्वारे केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असून देशाच्या सुरक्षेपेक्षा क्रिकेटला अधिक महत्त्व दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्यात जखमी आणि मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांच्या स्मृतीला विसरून, राष्ट्रवादाच्या नामाखाली खेळाला अधिक प्रतिष्ठा देण्याचा विरोध केला आहे.






