परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले अध्यक्ष

मुंबई : ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. अजित पवार गटाचे आशिष दामले हे या महामंडळाचे अध्यक्ष आहेत. महामंडळ स्थापन झाल्यानंतर त्याचा कारभार सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित राहील की, इतर मागासवर्गीय कल्याण विभागाच्या अखत्यारित, यावर वाद झाला होता. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजन विभागाच्या अखत्यारित हे महामंडळ राहील, अशी भूमिका घेतली होती.
महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देणारा शासन निर्णय नियोजन विभागानेच मंगळवारी काढला. दरमहा मानधन, बैठकीचे भत्ते, दूरध्वनी खर्च, वाहनाची सुविधा याचे स्वरूपही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. अध्यक्षांना कार्यालयीन कामकाजासाठी एक स्टेनो टायपिस्ट, एक लिपिक व एक शिपाई असेल. शासकीय समारंभांमध्ये मंत्र्यांनंतरच्या क्रमांकावर स्थान असेल, असेही आदेशात म्हटले आहे.