गोरेगावमध्ये वाहतुकीचा खोळंबा; ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलजवळील बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचा धोका

मुंबई : संदीप सावंत
गोरेगाव (पूर्व) येथील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल समोरच्या मोहन गोखले रोडवर दररोज होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे परिसरातील वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. विशेषतः शाळेच्या सुटण्याच्या वेळी पालक बेकायदेशीरपणे वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्ते व उबाठा शाखा क्र्. ५२ शाखा प्रमुख संदीप गाढवे यांनी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गाढवे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), वाहतूक पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि शाळा प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी या बेकायदेशीर पार्किंगमुळे उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या समस्या साईबाबा कॉम्प्लेक्समधील रहिवाशांना ये-जा करताना अडथळे येतात. रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे गोंधळ वाढतो.अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी गाढवे यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी या भागात नियमित गस्त घालून नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, RTO विभागाने शाळेच्या बस आणि इतर वाहनांवर योग्य नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे पत्रात म्हटले आहे. याशिवाय, BMC ने परिसरात स्पष्ट ‘नो पार्किंग’ फलक, रोड मार्किंग आणि आवश्यक सीसीटीव्ही व्यवस्था लावण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शाळा प्रशासनाने पालकांना वाहतूक शिस्तीबद्दल जागृत करावे आणि वाहने शाळेच्या आत सोडण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या मागण्यांवर तातडीने आणि परिणामकारक कारवाई न झाल्यास परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हे अनधिकृत पार्किंग केवळ वाहतुकीच्या समस्याच निर्माण करत नाही, तर यामुळे परिसरातील रहिवाशांसाठी सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.