वृद्ध कलाकारांना मानधन योजनेचा कोटा 100 वरून 300 करा
नमन लोककलेची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे शासनाला मागणी : रत्नागिरीत 'सांस्कृतिक नमन भवन' उभारण्याची विनंती

रत्नागिरी : जिल्ह्यातील वृद्ध आणि गरजू लोककलाकारांना अधिक आर्थिक मदत मिळावी यासाठी नमन लोककला रत्नागिरी जिह्याने महत्त्वपूर्ण मागण्या शासनाकडे केल्या आहेत. प्रामुख्याने ‘राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत रत्नागिरी जिह्यासाठी असलेला कलाकारांच्या मानधन मंजुरीचा इष्टांक (कोटा) १०० वरून ३०० पर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांयाकडे करण्यात आली आहे.
रत्नागिरीत प्रमुख मागण्यांचे निवेदन नमन लोककला रत्नागिरी जिह्याच्या शिष्टमंडळाने नुकता पालकमंत्री उदय सामंत यांयाकडे सादर केले. तसा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही हे निवेदन सादर केले. निवेदनानुसार, रत्नागिरी जिह्यामध्ये सांस्कृतिक नमन संस्थेचे ६२४ नमन मंडळे कार्यरत आहेत. त्या मंडळांशी जिल्हय़ात २५ हजार लोककलावंत या क्षेत्राशी जोडलेले आहेत. या सर्व कलावंतांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.
‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबवली जाते. या योजनेनुसार, ५० वर्षांवरील (दिव्यांगांसाठी ४०) आणि कला / साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे योगदान असलेल्या, तसेच वार्षिक उत्पन्न ६० हजारांपेक्षा जास्त नसलेल्या गरजू कलावंतांना दरमहा मानधन दिले जाते.
त्यासाठी दिलेल्या निवेदनातील प्रमुख दोन मागण्यांमध्ये जिल्ह्यातील वृध्द कलावंताना मानधन कोटा वाढवावा अशी आहे. रत्नागिरी जिह्यामध्ये कला आणि साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱया वृद्ध कलाकारांची संख्या मोठी आहे. सध्या जिह्यासाठी केवळ १०० कलाकारांना मानधन मंजूर करण्याचा कोटा आहे. हा कोटा वाढवून ३०० करावा अशी प्रमुख मागणी आहे. जेणेकरून जिल्ह्यातील अधिक गरजू वृद्ध कलावंतांना दरमहा रु. ५ हजार चे मानधन मिळू शकेल.
त्याबरोबर रत्नागिरी जिह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शासनाच्या भूखंडावर ‘सांस्कृतिक नमन भवन’ उभारण्यात यावे, जेणेकरून जिह्याच्या सांस्कृतिक आणि लोककला परंपरेला प्रोत्साहन मिळेल अशीही मागणी आहे. हे निवेदन देतेवेळी नमन लोककला रत्नागिरी जिल्हा संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर उर्फ पी. टी. कांबळे, मोहन घडशी, युयुत्सु आर्ते, संतोष कुळे, परशुराम मासये, गजानन तटकरे, विश्वनाथ गावडे यांयासह अन्य पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.