चिपळूण-खेड मधील पूर-बाधीत गावकऱ्यांना आ.सुनिल प्रभूंच्या माध्यमातून मदत वाटपाची ५वी फेरी
पूरग्रस्तांसाठी शिवसेनेचे मदतीचे सेवाकार्य अखंड सुरूच..

मुंबई । राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण , कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा फटका बसला. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले , तर काहींना जबर फटका बसला. नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. पूरग्रस्त बांधवाना त्यांचे संसार उभे करण्यासाठी मदत म्हणून त्यांच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सध्या राज्यभरातून मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत . कोकणात रायगड, रत्नागिरीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेने हाती घेतलेले मदतीचे सेवाकार्य अखंड सुरूच आहे. शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांच्या माध्यमातून घराघरात मदत वाटपाची ५वी फेरी पाठविण्यात येणार आहेत.
आमदार सुनिल प्रभु यांच्या माध्यमातून ताट,तांब्या, वाटी, कढई, टोप, पेले, चमचे अशा जेवण बनविण्यासाठी अत्यावश्यक भांड्यांचा सेट देण्यात येत असून. शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून साड्या, टॉवेल, सॅनिटरी नॅपकिन, गाऊन, चादरी, ब्लँकेट व ६ टन गव्हाचे पीठ अशा जीवनावश्यक किटचे घराघरात वाटप केले जाणार असून यामध्ये चिपळूण मधील चिपळूण शहर, कोंढे गाव, राहुल गार्डन, शंकरवाडी, वडार कॉलनी, सावंत आळी, नाईक कंपनी, पेदे ग्रामपंचायत, मुरादपुर, माप, खिर्डी आणि खेड मधील कोसरे, चोरवण, सातिर्ली, शिरगाव, केळणे इत्यादी भागात शिवसेना पदाधिकारी स्वतः जाऊन बधितांची मदत करणार आहेत.
पूरग्रस्तांना अशीही मदत
राज्यात कोकण, कोल्हापूर आणि सांगली येथे पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर व मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक डॉ. हेमचंद्र मंगेश सामंत यांनी स्वखर्चातून मागील काही दिवसांपासून अनेकजण नेसत्या कपड्यांसह राहत असल्याने त्यांना इतर आजार होऊ नये याकरिता आरोग्याची काळजी घेत माता- भगिनींना साड्या, गाऊन तसेच लहान मुलांना व जेष्ठ नागरिकांना सर्दीचा त्रास होऊ नये याकरिता लहान मुलांसाठी नवीन कपडे व वयोवृद्धांसाठी उबदार अंथरुणांकरिता चादरी तसेच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची मदत अशी जीवनावश्यक मदत सामग्री पाठविण्यात आली. शिवसैनिक डॉ. हेमचंद्र मंगेश सामंत यांनी मुख्य प्रतोद, आमदार, माजी महापौर मुंबई सुनिल प्रभु यांच्याकडे सदरहू सामग्री सुपूर्द केली. यावस्तू कोकणातील गावांमध्ये शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी स्थापित केलेल्या कॅम्पमध्ये रवाना करण्यात येतील अशी माहिती आमदार सुनिल प्रभु यांनी दिली.
यावेळी उपमहापौर सुहास वाडकर, विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, उपविभाग प्रमुख सुनिल गुजर, प्रदिप निकम, गणपत वरिसे, भाई परब, नगरसेवक तुळशीराम शिंदे, आत्माराम चाचे, युवासेना कार्यकारी सदस्य अंकित प्रभु, ज्येष्ठ शिवसैनिक व स्टेट कमिटी ऑफ एआयबीआरएफ, महाराष्ट्र विंगचे उपाध्यक्ष प्रमोद देसाई यांच्यासह शाखा प्रमुख उपस्थित होते.