मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत पार पडलं ५ दिवसीय हिवाळी अधिवेशन..

मुंबई- गेल्या पाच दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस पार पडला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत यंदाचे अधिवेशन पार पडले. अधिवेशन म्हटलं की विरोधक आणि सत्ताधारी अनेक मुद्यांवरून आमने-सामने येतात. तसंच चित्र यंदाच्या अधिवेशनामध्ये पाहायला मिळालं. शिवभोजन थाळी घोटाळा,महिला सुरक्षेचा प्रश्न,शेतकऱ्यांच्या समस्या, वीज तोडणी प्रकरण आणि अन्य सामाजिक गोष्टींवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यातून आरोप-प्रत्यारोप देखील झाले.
विरोधकांच्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांनी उत्तर देत आपली बाजू उचलून धरली. यंदाच्या अधिवेशनात महिला सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा शक्ती कायदा संमत करण्यात आला. या कायद्याचं सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून संगनमताने स्वागतही झालं.
मात्र,आज शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक कायद्यानं सभागृहात गदारोळ माजला.विरोधकांच्या गोंधळामध्ये सत्ताधारी सरकारनं विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुटे सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडी सरकार आहे. हे आज सिद्ध झालं, विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर चर्चा सुरू असतानाच जाणीवपूर्वक ठरवून चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेऊन चर्चा न करता हे विधेयक मंजूर करून घेण्याचं पाप आज सरकारने केलं’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.तर दुसरीकडं जबरदस्तीनं कोणतही विधेयक मंजूर न झाल्यास सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं. दरम्यान पाच दिवसांमध्ये एकूण चोवीस विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून गाजलं यंदाचं अधिवेशन:-
पहिल्या दिवसापासून अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून चर्चा रंगवल्या जात होत्या. सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री उपस्थित राहतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाला उपस्थित राहता आले नाही. तसेच दुसरीकडे अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळातील दोन मंत्री आणि एकूण पन्नास जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे यंदाचा अधिवेशन संवेदनशीलपणे आणि कोरोना नियमांचं पालन करून गांभीर्यपूर्ण पार पडलं.