मुंबईकडून वर्ल्डकप फायनल हिरावून घेऊ नका; BCCI उपाध्यक्षांनी दिले प्रत्युत्तर

मुंबई – टी 20 विश्वचषक 2024चे जेतेपद जिंकून भारतीय संघ गुरुवारी (ता. 4 जुलै) मायदेशी परतले. यावेळी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संपूर्ण भारतीय संघ हा मुंबईमध्ये आला. यावेळी भारतीय संघाची विजयी परेड ही मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर काढण्यात आली. तसेच, वानखेडे स्टेडियममध्ये एका कार्यक्रम आयोजित करत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजयी परेडमध्ये लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेक चाहते भारतीय संघाचे अभिवादन करण्यासाठी या विजयी परेडमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केले. त्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सडेतोड उत्तर दिले.
शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले होते की, “मुंबईमध्ये झालेला उत्सव हा बीसीसीआयला एक मजबूत संदेश आहे. मुंबईकडून विश्वचषकाचा अंतिम सामना कधीही हिरावून घेऊ नका.” असा टोला त्यांनी यावेळी लगावला. यावर उत्तर देताना बीसीसीआयचे राजीव शुक्ल म्हणाले की, “अनेक उपांत्य आणि अंतिम सामने हे मुंबईमध्ये झाले आहेत. अहमदाबादच्या स्टेडियमची क्षमता 1,30,000 आहे. क्षमता बघून आम्हाला आयोजन करावे लागते. या संदर्भात निर्णय घेताना स्टेडियमची क्षमता बघून हा निर्णय घ्यावा लागतो.
कोलकत्ता स्टेडियमची क्षमताही खुप मोठी आहे, सुमारे 80,000 प्रेक्षक तिथे जाऊ शकतात. इतर शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे.” असे म्हणत त्यांनी उत्तर दिले. राजीव शुक्ला म्हणाले की, “संपूर्ण देश आणि सर्व स्टेडियम लक्षात घेऊन अंतिम सामना कुठे खेळवायचा हा निर्णय घेण्यात येतो. तुम्ही फक्त एका ठिकाणापुरते मर्यादित राहू शकत नाही.” असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.