सतीश वाघ-शून्यातून विश्व उभारणारा द्रष्टा उद्योजक

जोगेश्वरीतल्या अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला तरुण स्वतःची फार्मा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उभारण्याचं स्वप्न उराशी बाळगतो.. सारस्वत बँकेकडून तीन लाख ऐंशी हजारांचे कर्ज घेऊन व्यवसायात प्रगती करतो आणि अवघ्या 38 वर्षात 680 करोड रुपयांची उलाढाल असलेल्या ‘सुप्रिया लाइफसायन्स’ या 128 देशांमध्ये एक्सपोर्ट करीत असलेल्या फार्मास्युटिकल (एपीआय) कंपनीचा मालक बनतो..
गोरेगाव मिररचे संपादक महेश पावसकर यांनी या गोरेगावकर उद्योजकाची घेतलेली ही मुलाखत..
प्रश्न: मराठी माणूस हा व्यवसायात मागे असल्याचं नेहमीच बोललं जातं.. अशावेळी स्वतः जवळ कोणतीही मोठी पुंजी नसताना आपण एक यशस्वी उद्योजक कसे झालात?
श्री. वाघ: माझा जन्म एका अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. जोगेश्वरी ही माझी जन्मभूमी.वडील फायर स्टोन कंपनीतून निवृत्त होण्याच्या मार्गावर होते..घरी आई, तीन बहिणी आणि एक भाऊ असे आमचे कुटुंब होते. मी आर्ट्स मधून माझं ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर तीन वर्ष कायद्याचे शिक्षण (LAW) घेऊन वकील बनावं,असा माझा मानस होता.
मात्र नियतीच्या मनात काही वेगळे होते. माझे अंबरनाथ मधील मामा फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात होते. त्यांनी मला त्यांच्या कंपनीत भागीदार होण्याची ऑफर दिली. आता फार्मास्युटिकल कंपनी जॉईन करायची तर बीएससी होणे गरजेचे होते मग मी बीएससी ला ऍडमिशन घेतली…ती एक मोठीच कहाणी आहे.. ऍडमिशन मिळवण्यापासून ते फॅकल्टी निवडी पर्यंत अनंत अडचणी समोर उभ्या ठाकल्या… मात्र या सर्वांवर मात करून मी नॅशनल कॉलेजमधून रसायनशास्त्रात 86% गुण मिळवून मधून प्रथम वर्गात बीएससी (ऑनर्स) उत्तीर्ण झालो आणि माझ्या मामाच्या कंपनीत अंबरनाथ येथे 1977 साली केमिस्ट या पदावर जॉईन झालो. मला महिन्याला पगार होता 120 रुपये आणि रेल्वे पासला आठ रुपये मिळायचे. नोकरीला जाण्यासाठी मी सकाळी सव्वासहाला जोगेश्वरी रेल्वे स्टेशनला यायचो 6:25 ची लोकल पकडून दादरला आणि मग त्यानंतर सेंट्रल रेल्वे पकडून बदलापूरला आठ वाजता पोहोचायचो. रेल्वे ट्रॅक वरुन चालत चालत मी अंबरनाथ ला फॅक्टरीत पोहोचत असे.1977 ते 1979 अशी तीन वर्ष मी नोकरी केली त्यानंतर दत्ता सामंत यांच्या संपाचं लोण आमच्या कंपनीपर्यंत पोहोचल्याने आम्हाला आमचा मुक्काम अंबरनाथ वरून थेट चिपळूण ला हलवायला लागला.
1977 ते 1986 अशी नऊ वर्ष नोकरी करून देखील माझा महिन्याचा पगार 1140 रुपये इथपर्यंतच येऊन थबकला आणि मामा भागीदारी देण्यास उत्सुक नव्हता. अश्या वेळेला मी प्रचंड निराश झालो..आयुष्याची उमेदीची 9-10 वर्ष वाया गेली असे वाटून मी स्वतः चा व्यवसाय करण्याचे निश्चित केले.
लोटे परशुरामला असतानाच तत्कालीन एमआयडीसीचे महाव्यवस्थापक आयएएस अधिकारी सुरेश साळवे यांच्याशी परिचय झाला होता. माझ्या भाषणांमुळे ते प्रभावित झाले होते, आणि तुला कधी काय गरज पडलीच तर मला भेट असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी मी त्यांना भेटलो. त्यांनी त्यांनी मला तारापूर येथे एमआयडीसी तर्फे एक प्लॉट मिळवून दिला. त्या प्लॉट साठी भरायचे होते 1 लाख 85 हजार रुपये..मात्र घरी 1 लाख 85 हजार रुपये भरायची ऐपत नव्हती म्हणून मी अनेक नातेवाईकांकडे खेटे घातले. काका, मामा,आत्या,मावशी सर्वांकडे.. पण कुठूनही पैशाची उभारणी झाली नाही. आता हाता तोंडाशी आलेला घास निघून जातो आहे हे पाहून मी खूप रडलो. मला अत्यंत वाईट वाटले. माझ्या व्यवसायाचे स्वप्न आता धुळीस मिळणार असं जवळपास नक्की झालं होतं..
शेवटी माझ्या धाकट्या मामाच्या सल्ल्याने मी पुन्हा एकदा लोटे परशुराम जवळ त्या काळी स्वस्त असलेला प्लॉट सुरेश साळवी यांना सांगून पदरात पाडून घेतला. त्यासाठी सुरेश साळवे यांनी व्यक्तिशः प्रयत्न केले.. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. केवळ त्यांच्यामुळेच मी या व्यवसायात उतरू शकलो.
प्रश्न: लोटे परशुराम येथे अवघ्या दहा हजार रुपयात मिळालेल्या भूखंडाचे आपण पुढे सोनं केलं ती कहाणी ऐकायला आवडेल..
श्री.वाघ: अतिशय स्वस्त परंतु घरापासून खूप लांब असलेला हा प्लॉट घेऊन मी माझी कंपनी सुरू केली. ज्यावेळेला मला प्लॉट ॲलॉट झाला,त्यावेळेला सुरेश साळवे यांनीच मला माझ्या कंपनीचे नाव सुचवलं ते म्हणाले तुझ्या कंपनीचं नाव ‘सुप्रिया’ ठेव…आणि तेव्हापासून सुप्रिया लाइफसायन्स ही कंपनी केवळ त्यांनी सुचवलेलं नाव आणि त्यानंतर त्यांचे आशीर्वाद आणि माझी मेहनत याच्यामुळे पुढे नावारूपाला आली.
मी एमएसएफसी कडून 3 लाख 80 हजार रुपयांचे कर्ज घेऊन तिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं मात्र एका दिवशी एमएसएफसी च्या व्यवस्थापकांनी दिलेल्या वागणुकीला कंटाळून मी सारस्वत बँकेकडे कर्जासाठी मोठ्या अपेक्षेने वळलो..
गोरेगाव पश्चिमेला टोपीवाला टॉकीज कडे असलेल्या सारस्वत बँकेच्या कार्यालयात मी गेलो माझी कागदपत्रे बघून सारस्वत बँकेने 3 लाख 80 हजार रुपयाचं माझं एमएसएफसी चे लोन टेक ओव्हर केलं बॅंकेने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळेच मी माझी पुढची वाटचाल करू शकलो.
या सर्व वाटचालीत एका वेळेला अशी परिस्थिती आलेली की माझा नफा व्यवस्थित पुढे जात नव्हता.. अशा वेळेस सारस्वत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मा. एकनाथ ठाकूर साहेब यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मला लाभले. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे कारण त्यांच्यामुळेच मला व्यवसाय वृद्धी कशी करावी हे शिकायला मिळालं त्यांनी मला आधी मला तुमच्या बॅलन्स शीट वर काम करा आणि ती स्ट्रॉंग करा..तुमचा CFO बदला असा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी कामाला लागलो एका वेळेला तर त्यांनी मला अतिशय झापलं..मात्र ते प्रेमापोटी होतं हे मला नंतर समजलं..त्यांनी मला अनेक मौलिक असे सल्ले दिले. त्यांनी मला EBITA शिकवला. ज्याच्यामुळे मला यशाचा मार्ग सापडला.. कंपनी फायद्यात कशी चालवावी हे शिकलो आणि म्हणुनच पुढे ही वाटचाल करू शकलो. एकनाथ ठाकूर आणि सारस्वत बँक यांच्या सहकार्यामुळेच माझी ‘सुप्रिया लाइफसायन्स’ ही कंपनी जी केवळ 3 लाख 80 हजार रुपये या लोन रकमेवर उभारून सुरू केली होती तिचा आज टर्नओव्हर 680 करोड रूपयांवर गेलाय. आणि 128 देशांत आमची कंपनी आमच्या निर्मितीच्या 89% एक्सपोर्ट करत आहे..
फार्मास्युटिकल (एपीआय) म्हणून आम्ही Anti-alergic, Anti anesthetic,Cholesterol आणि vitamins अश्या सुमारे 52 प्रोडक्ट ची निर्मिती करतो.
प्रश्न: सुप्रिया लाइफसायन्स कंपनीची भविष्यातली वाटचाल कशी असेल?
श्री. वाघ: येत्या दोन वर्षात आम्ही 1600 कोटींचा आकडा पार करू ज्याचा EBITA 40 % असेल. सध्या अंबरनाथ MIDC मध्ये आमच्या नवीन युनिट चे जवळपास पावणेदोन लाख स्क्वेअर फूट बांधकाम सुरू असून त्यात 100 कोटी ची गुंतवणूक केली आहे. तर लोटे परशुराम चिपळूण येथे 70 हजार स्क्वेअर फूट बांधकाम सुरू आहे. या दोन्ही यूनिट्स मधून प्रत्येकी 600 कोटी असे एकूण 1200 कोटी निर्माण होतील अशी माझी अपेक्षा नव्हे खात्री आहे.
आज आमच्या कंपनीच्या शेयर चा भाव 565 रूपयांवर गेला आहे..गेल्या 10 दिवसांपूर्वी प्रसारित झालेल्या हिंडेंनबर्ग च्या अहवालात ज्या 5 प्रमुख कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यास उत्तम आहेत असे सांगितले गेले त्यात आमच्या कंपनीचा शेअर पाचव्या क्रमांकावर आहे असे CNBC आवाज या चॅनेल वर सांगितले गेले…ही माझ्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे..