महाराष्ट्र

एसटी महामंडळाची आक्रमक भूमिका,तब्बल ५५ हजार संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा,नवीन भरतीसाठीही सुरू केल्या हालचाली

Yea मुंबई- मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असून आता महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी महामंडळाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पुन्हा एकदा एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

एसटी महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना साद घातली असून महामंडळाने त्या अनुषंगाने जाहिराती देखील प्रसिद्ध केल्या आहेत. या जाहिरातीनुसार वय ६२ वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. करार पद्धतीवर नेमणूक होणाऱ्या चालकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत, त्या विभागांमध्ये करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करू शकणार आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये अर्ज करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. इच्छुक उमेदवारावर एसटी महामंडळाच्या सेवेत असताना अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघाताची नोंद नसणे, शिक्षा म्हणून बडतर्फ किंवा सेवामुक्त केलेला नसावा अशी अटही महामंडळाने ठेवली आहे.

एसटीतील सेवानिवृत्तांना आवाहन करताना एसटी महामंडळाने इतरही कंत्राटी चालकांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून करार पद्धतीने चालक भरती करून घेण्यासाठीचे अर्ज मागितले आहेत. या कंत्राटी चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचा किमान एक वर्षाचा अथवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय संबंधित उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना व पीएसव्ही बॅच असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे चालकांची नियुक्ती करून देणाऱ्या संस्थांनी महामंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान एसटी महामंडळातील तब्बल ५५ हजार संपकरी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत एसटी महामंडळातील तब्बल ११४४ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. तर ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना संप काळातील पगार मिळणार नसल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!