ब्रेकिंगमंत्रालयमहाराष्ट्र

Big Breaking-गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; मास्क सक्ती ही हटवली

मास्क वापरणे देखील आता ऐच्छिक

मुंबई:महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध परवा पासून (२ एप्रिल २०२२) हटवण्यात आले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे गुढीपाडवा या सणादिवशी शोभायात्रांमध्ये कसली आडकाठी येणार नसून धुमधडाक्यात हा सण साजरा करता येणार आहे.तसेच रमजानला मिरवणुका काढण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्यांना मास्क वापरायचे आहेत त्यांनी वापरावे, तर ज्यांना वापरायचा नाही त्यांनी वापरू नये. याचाच अर्थ मास्क हा ऐच्छिक असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. गुढी पाडव्याच्या मिरवणुका जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणुका जोरात काढा असं ट्विट करत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने मंजूर झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्य अनलॉक झालं आहे. कोणतेही निर्बंध आता राज्यात असणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे.राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोना काळात जे निर्बंध लावण्यात आले होते ते हटवण्यात आले आहेत. ७३६ दिवसांनंतर महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. इथे महाराष्ट्र मास्क मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी मास्क वापरणे ऐच्छिक आहे, असे त्यांनी सांगितले.

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

नववर्षापासून नवीन संकल्प करुयात-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!