समाजवादी चळवळीचा वटवृक्ष : डॉ जी जी पारिख!
१९७८ साल ! महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. तत्पूर्वी १९७७ साली भारतीय राजकारणातील अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या सरकारला उलथवून लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले होते. इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ ला आणिबाणी लादून भल्या भल्यांना तुरुंगात डांबले होते. इतकेच काय तर कॉंग्रेस मधल्या तरुण तुर्क म्हणून ओळखण्यात येणाऱ्या चंद्रशेखर, मोहन धारिया आणि कृष्णकांत यांनाही इंदिराजींनी तुरुंगाची हवा खायला लावली. समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि मुरारजींचा संघटना कॉंग्रेस या चारही पक्षांचे नेते कारागृहात होते. कारागृहात या सर्व नेत्यांनी मतभेदाचे १०% बाजूला ठेवून एकमताच्या ९०% वर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. परिणामी या चारही पक्षांचा एक जनता पक्ष स्थापन करण्यात आला.
मार्च १९७७ मध्ये मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. नांगरधारी शेतकरी निवडणूक चिन्ह घेऊन जनता पक्षाचे खासदार मोठ्या संख्येने निवडून आले होते. भारतीय राजकारणाच्या इतिहासात आधी पक्ष सत्तेवर आला आणि मग मे १९७७ मध्ये अधिकृतपणे जनता पक्ष स्थापन झाला. कारण नांगरधारी शेतकरी हे चिन्ह भारतीय लोकदलाचे होते. १९७८ साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. जनता पक्ष जोरात होता. त्यामुळे या पक्षातर्फे निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्ते नेते यांच्यात अहमहमिका लागली होती. माझे वडील वसंतराव त्रिवेदी ठाणे जिल्हा जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते परंतु आहुति साप्ताहिकाचे संस्थापक संपादक या नात्याने त्यांचा पुरेपूर अभ्यास होता.
ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघ मोठे होते आणि जिल्ह्यात विधानसभेचे १३ मतदारसंघ होते. डॉ. गुणवंतराय गणपतलाल उर्फ जी जी पारिख आणि प्रभूभाई संघवी हे ज्येष्ठ समाजवादी नेते तसेच बल्लुभाई उर्फ बी. ए. देसाई हे मुरारजींच्या पक्षाचे नेते जनता पक्षाचे निरीक्षक म्हणून अंबरनाथ येथे आले. वसंतराव त्रिवेदी यांनी संपूर्ण १३ विधानसभा मतदारसंघाचे चित्र या तिन्ही श्रेष्ठींसमोर मांडले. वसंतराव स्वतः समाजवादी असल्याने त्यांचा जी जी पारिख आणि प्रभूभाई संघवी यांच्या समवेत चांगला संबंध होता. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून वसंतराव हे इच्छुक होते. तसेच संघाचे काही नेते सुद्धा इच्छुक होते. वसंतराव त्रिवेदी यांनी निरीक्षकांना स्पष्ट शब्दात सांगितले की मला उमेदवारी द्या किंवा देऊ नका. तुम्ही द्याल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आमची.
दुसरीकडे संघिष्ट नेत्यांनी आम्हाला उमेदवारी दिली नाही तरी चालेल पण वसंतराव त्रिवेदी यांना उमेदवारी देऊ नका अशी भूमिका मांडली. परिणामी डोंबिवली येथून आयात केलेल्या उमेदवाराला वसंतराव त्रिवेदी यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे निवडून आणला. जी जी पारिख यांच्या समवेत तिथपासून घनिष्ठ संबंध निर्माण झाले. पुढे मग मी सामना मध्ये कार्यरत असतांना प्रा. मधू दंडवते, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, जी जी पारिख, वसंत बापट, शाहीर लीलाधर हेगडे, भाई वैद्य, प्रा. ग. प्र. प्रधान, गोपाळ दुखंडे, कृष्णाजी ठाकूर, प्रा. रत्नाकर महाजन, हुसेन दलवाई अशा वरिष्ठ पातळीवर कार्यरत असलेल्या विविध समाजवादी नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले. कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी मी संपर्क साधत असे आणि हे नेतेही प्रतिक्रिया देत असत.
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर प्रा. मधू दंडवते यांनी फॅक्स वरुन सामनात शोकसंदेश पाठवला तेंव्हा माझे आणि त्यांचे बोलणे झाले होते. वसंतराव त्रिवेदी यांना प्रा. मधू दंडवते आहुति म्हणून हाक मारत असत. पत्रकार या नात्याने आणि जवळकीच्या संबंधाने जी जी पारिख यांच्या समवेत दूरध्वनीवरून बोलणे होत असे. समाजवादी विचारांच्या संस्था आपल्याला टिकवायला हव्यात यावर त्यांचा कटाक्ष असे. अपना बाजार, अपना बॅंक, सुपारीबाग, जनता केंद्र, डॉ. पी. व्ही मंडलिक ट्रस्ट, युसुफ मेहेर अली केंद्र, साने गुरुजी ट्रस्ट, आंतरभारती, साने गुरुजी कथामाला अशी समाजवाद्यांची बलस्थाने. योगायोगाने सामनातून निवृत्त झाल्यानंतर मुक्त पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून कार्यरत असतांना साथी उमेश ठाकूर, साथी दिनेश राणे, ॲड प्रीति बने, निलेश मांजवकर या सहकाऱ्यांनी जनता केंद्र ताडदेव येथे एका २७ फेब्रुवारी रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मराठी भाषा गौरव दिली मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. तेथेही जी जी पारिख यांच्या संदर्भात चर्चा झाली. अरुण दुधवडकर, मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.
नंतर २९ ऑक्टोबर २०२२ रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते जगदीश तिरोडकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच गोरेगांव येथील ज्येष्ठ समाजवादी नेत्या मोहिनी अणावकर आणि मी दहिसर येथील जगदीश तिरोडकर यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तिथे अंत्यदर्शन घेतले. या ठिकाणी सुद्धा शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या डॉ. जी जी पारिख यांनी आवर्जून हजेरी लावली. मधु मोहिते त्यांना घेऊन आले होते. मधु मोहिते हे सुद्धा आमच्या मित्रपरिवारातलेच. जी जींची भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि माझे दुसरे पुस्तक गुरुजी त्यांना दिले. जी जीं नी आवर्जून ते अवलोकन केले आणि मला शुभेच्छा दिल्या. मधु मोहिते यांनी आवर्जून गुरुजी पुस्तक अवलोकन करतांनाचे छायाचित्र मला पाठवले हीच आपली खरी श्रीमंती. मधू दंडवते, वसंत बापट, प्रा. ग. प्र. प्रधान या समाजवादी नेते मंडळींची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली.
याचवेळी साथी दत्ता ताम्हाणे यांच्या नंतर वयाची शंभर वर्षे पूर्ण करण्याचे भाग्य डॉ. जी जी पारिख यांना लाभले. मंगला पारिख या डॉ. जी जी पारिख यांच्या जीवनसाथी, ज्या केवळ त्यांच्या पत्नी नव्हत्या, त्या त्यांच्या अर्थात जी जी पारिख यांच्या स्वप्नांचा समाज घडवण्यात त्यांच्या भागीदार होत्या. मंगला पारिख एक अतिशय उत्साही कार्यकर्त्या होत्या. त्या राष्ट्र सेवा दल आणि नंतर समाजवादी पक्षात सक्रिय भूमिका बजावत होत्या आणि विविध जनआंदोलनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. हे, त्यांचे २००९ मध्ये निधन झाले. मंगला पारिख या डॉ जी जी पारिख यांच्या पेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्या. मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक आणि समाजवादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून समाजवादी चळवळीत एक प्रमुख व्यक्ती म्हणूनही काम केले आहे.
जयप्रकाश नारायण यांची चळवळ, आणि १९७० च्या दशकात महाराष्ट्रात महिलांनी नेतृत्व केलेले महागाईविरोधी आंदोलन हे मंगलाताईंचे जीवनातील काही वैशिष्ट्ये आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी सन १९६१ मध्ये युसूफ मेहरअली सेंटरची स्थापना करून मागील सात दशके अविरत सेवा करणारे, देशातील ११ राज्यांमध्ये सेंटरच्या शाखा निर्माण करून हजारो दीनदुबळ्यांचे आधार बनलेले गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक तथा ज्येष्ठ समाजसेवक म्हणून डॉ.जी.जी. पारिख यांची ओळख. समाजवादी कसा दिसतो, हे चित्ररुपाने कुणाला सांगायचं झाल्यास, जीजींचे छायाचित्र डोळ्यासमोर आणावे . पांढरीशुभ्र दाढी, खादीचा सदरा, पायजमा, चेहऱ्यावरील मनमिळावू भाव आणि बोलण्यातील कमालीची आपुलकी असणारे जी. जी. पारीख खाच-खळग्यांचा, आड-वळणांचा प्रवास असतांना, आज पर्यंत जीजी ‘वृद्ध’ झाले नाहीत. ते वाढत्या वयानुसार आणखी नव्या उमेदीने विचार मांडत असत. बोलतात. स्वतः वैद्यकीय अधिकारी असूनही आणि कोणत्या वेळेला कोणता आहार ग्रहण करायचा याची जाणीव असतांना ते त्यांनी कधीही पाळले नाही. परंतु समाजकार्याची जिद्द त्यांना पुढे घेऊन जाऊ लागली. त्यांच्यातला उत्साह थक्क करणारा आहे. १९४० साली जीजी पारीख मुंबईत आले. सेंट जॉर्ज कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत. तेव्हा ते अवघ्या १६ वर्षांचे होते. त्याच काळात देशात स्वातंत्र्याचा लढा यशाकडे मार्गस्थ झाला होता.
१९४२ च्या ७ आणि ८ ऑगस्टला मुंबईत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मिटिंग होती. गांधीजींनी ‘छोडो भारत’ची घोषणा दिली. आणि गांधीजींच्या विचारांनी भारावलेले जी.जी. सक्रीयपणे लढ्यात उतरले. स्वत:च्या महाविद्यालयामध्ये ब्रिटिशांविरोधात तीन दिवसीय बंद पुकारला. त्याची निदर्शनं म्हणून चर्चगेट स्टेशनला जाऊन रेल्वे रोखल्या. यात जी. जींना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना तुरुंगात डांबलं. साधारण अठरा एकोणीस वर्षांच्या जी.जींना पहिल्यांदा १० महिन्यांचा तुरुंगवास झाला. पुढे लोकांच्या प्रश्नांसाठी तुरुंग वगैरे त्यांना नेहमीचे झाले. १९४७ साली ते स्टुडंट काँग्रेसच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. ते मूळचे समाजवादी विचारांचे होते. पुढे आपल्या विचारांवर जगण्याचा निर्णय घेतला. लोकांसाठी ते कायम लढत राहिले. सहकारी चळवळ असो वा कामगार संघटना, किंवा खादी चळवळ असो, जी.जीं.चं योगदान बहुमोल आहे. अर्थात, त्यांनी या सर्व कार्याचा गवगवा कधीच केला नाही. सत्कार समारंभ, गौरव वगैरे गोष्टींपासून ते मैलोनमैल दूर राहिले. आपल्या सत्ताधाऱ्यांनाही जीजींची महती कळली नसावी. हे जी. जींचं दुर्दैव नव्हे, तर आपले दुर्दैव आहे. आज खादीचा प्रचार-प्रसार आपणच सुरु केल्याचा आव आणत काहीजण चरख्यासोबत छायाचित्र काढतात.
अशांना आठवण करुन द्यावी वाटते, जी.जींनी खादी आणि खादीमागचा विचार स्वत:च्या आयुष्यात भिनवला. ते अखेरपर्यंत खादीचे कपडे परिधान करीत. १९७० च्या दशकात तर त्यांनी ‘खादीकडे फॅशन म्हणून बघा’ हा विचार मांडला होता. ३० डिसेंबर १९२४ रोजी सौराष्ट्रमधील (गुजरात) सुरेंद्र नगरमध्ये जन्मलेल्या जी. जींनी महाराष्ट्र आपली कर्मभूमी मानली. आणि अगदी काल-परवापर्यंत म्हणजे वयाच्या १०१ व्या वर्षी अंथरुणात राहूनही त्यांचं कार्य अविरत सुरु ठेवले आहे. पनवेल जवळील कर्नाळा ग्रामपंचायत मधील तारा आणि बांधनवाडी इथे स्थित असलेली युसुफ मेहरअली सेंटर नावाची ही शाश्वत विकासाची प्रयोगशाळा पाहिल्यानंतर स्वतः गोल्ड मेडलिस्ट असलेले डॉक्टर यांनी उभे केलेले आभाळभर कार्य लक्षात येते.
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी, २ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे डॉ जी जी पारिख यांनी वयाच्या १०२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपले पार्थिव ज. जी समूह रुग्णालयात देऊन देहदान केले समाजासाठीची ही निस्वार्थ सेवाच म्हणावी लागेल. ज्या विचारधारेला ते पसंत करीत नव्हते, तसेच देशात जे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे ते अस्वस्थ करणारे आहे अशी भावना व्यक्त करणाऱ्या जी जींनी त्या विचारधारेला शतक पूर्ण होत असतांना इहलोकीची यात्रा संपवली, हा वेगळा संकेत तर नाही नां ? समाजवादी वटवृक्षाच्या महान विभूती डॉ. जी. जी. पारिख यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन !
– योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).