शपथेचा भंग केल्यामुळे मविआचे मंत्रिमंडळ बरखास्त करा-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई- विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात होणारा वाद राज्यासाठी नवी नाही.भाजपाकडून सातत्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडावं यासाठी काही ना काही खुरापती होताना दिसतात.अशात आज पुन्हा एकदा राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्याच्या राज्यपालांची भेट घेवून त्यांच्याकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनच्या दंडमाफी प्रकरणाची तक्रार केली आहे.
आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य भाजपा नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना याबाबतचं निवेदन सादर केले आहे. शिवाय,या प्रकरणी संपूर्ण मंत्रीमंडळाविरोधात एफआयआरची नोंद करावी व मंत्रीमंडळ बरखास्त करावं अशी देखील त्यांनी मागणी केली.
राज्यापालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘नऊ मजली इमारत अधिकृत आणि चार मजले अनधिकृत अशा इमारतीवर बसलेला ४ कोटी ३० लाख हा दंड आणि व्याज मंत्रीमंडळ बैठकीत माफ करण्यात आला. ही अत्यंत बेकायदेशीर गोष्ट आहे आणि घटनेच्याविरोधी आहे. मंत्रीमंडळाने शपथ घेताना अशी शपथ घेतलेली असते, की आम्ही कोणाही एका व्यक्तीला लाभ होईल असं वर्तन करणार नाही.
जर अशाप्रकारे अनधिकृत बांधकामांना दंड,व्याज लागलेला माफ करून त्या इमारती जर मोकळ्या करायच्या असतील, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं धोरण ठरलं पाहिजे. हा एका अर्थाने आमदार प्रताप सरनाईक यांना फायदा होण्यासाठी घेतलेला निर्णय आहे, की ज्यामध्ये वित्त विभागाने सगळे निगेटिव्ह रिपोर्ट लिहिले आहेत. तरी एका व्यक्तीला फायदा होण्यासाठी घेतलेला जो निर्णय आहे, तो मंत्री होताना जी शपथ घेतलेली असते त्याचा भंग करणारा आहे,त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेवून मंत्रीमंडळ बरखास्त करण्यात यावे’.आता याबाबत शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.