सिंधुदुर्गात अराजक…

मुंबई – शाम देऊलकर
सिंधुदुर्गात राडे गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून होतच आहेत. त्यामुळे राडा होणे हे तिथे काही नवे नाही. तसा तो आज झाला. आधीच्या तुलनेने गेली काही वर्षे तळकोेकण बऱ्यापैकी शांत होते. पण आज मालवणच्या सागरकिनारी अक्षरशः दंगल झाली. दोन्ही राजकीय गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. पोलीसही जखमी झाले. सध्याचे राजकारण बघता येत्या काळात लोकांना कोेकणात शब्दश: ‘धुमशान’ बघायला मिळण्याची शक्यता आहे. इथे मूळ प्रश्न आहे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा. आधीच ‘सार्वजनिक बांधकाम’च्या कर्तृत्वामुळे महाराजांचा पुतळा कोसळला आणि आता नाकर्त्या प्रशासनामुळे पुन्हा प्रचंड तणाव जिल्ह्याने अनुभवला. आठ दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक लागेल. त्यामुळे आगामी काळात प्रशासनाची मोठी परीक्षा आहे. आता जिल्ह्यात असलेले प्रशासन पूर्णतः पांगळं असल्याचं आजच्या घटनेवरुन दिसून आलं. जिल्हाधिकारी किशोर तावडे व जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचा प्रशासनावर कुठलाही अंकूश दिसून आला नाही. आज जिल्ह्यात दोन्ही विरोधी पक्षनेते व तीन पक्षांचे वरिष्ठ नेते येणार होते. त्यामुळे प्रशासन आधीपासूनच सज्ज पाहिजे होतं. परंतु कुठलीही तत्परता दाखवली गेली नाही आणि त्याचा व्हायचा तोच दुष्परिणाम झाला. जिल्ह्याला पुन्हा दंगल अनुभवायला मिळाली.
कोकण आणि सिंधुदुर्गचा इतिहास तसा शांततेचा आहे. गेल्या काही वर्षांतील राजकीय राडे सोडले तर या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात कमी गुन्हे घडतात. पण राणे आणि राजकीय राडे हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र अनुभवत आहे. मल्लिकार्जुन प्रसन्ना हे तत्कालिन पोलीस अधिक्षक सोडले तर जिल्ह्यात आलेल्या जवळपास सर्व अधिक्षकांनी राणेंच्या प्रभावाखालीच काम केले. शिवसेनेनेही वेळोवेळी राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. तशी ती आजही घेतली गेली. मुळात महाराजांचा पुतळा कोसळणे, ही दुर्दैवी घटना होती. त्यामुळे विरोधक आक्रमक होणारच होते. या कारणास्तव पोलिसांनी दक्ष राहणं गरजेचं होतं. परंतु ही दक्षता कुठेच दिसली नाही. खरं म्हटलं तर गेले दोन दिवस राणे शांत होते. परंतु पुतळा कोसळण्याच्या घटनेचं ‘मायलेज’ विरोधकांना घेऊ द्यायचं नाही, या हेतूने आज राडा झाल्याची शक्यता वरकरणी तरी दिसत आहे. एकतर सत्ताधाऱ्यांनी कितीही नाकारलं तरी पुतळा कोसळण्याच्या घटनेमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे. त्यात थेट मुख्यमंत्रीपुत्राचे ‘कनेक्शन’ समोर येत असल्याने व पंतप्रधानांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाल्याने भाजप व शिंदेंवर प्रचंड ‘प्रेशर’ आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात अजून काही गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. आधीच तेथील बांधकाम विभाग प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता पोलीस प्रशासनाचा डरपोकपणाही समोर आला आहे. जिल्ह्यात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून आजचा प्रकार म्हणजे काही वर्षांपूर्वी झालेल्या ‘वेंगुर्ला एपिसोड’ची पुनरावृत्ती म्हणावी लागेल.
गेल्या दोन दशकात ‘ठाकरे विरोध’ हाच राणेंच्या राजकारणाचा पाया राहिला आहे. भाजप राणेंचा यासाठी पुरेपूर उपयोग (का दुरुपयोग) करून घेत आहे. आज नारायण राणे कुठल्याही मंत्रीपदी नाहीत. पण लोकनियुक्त खासदार आहेत. त्यामुळे ते त्यांच्या ‘स्टाईल’ने ठाकरेंना प्रत्युत्तर देणार, याची कल्पना जिल्हा प्रशासनाला येणं गरजेचं होतं. ज्युनिअर राणेंनी काही महिन्यापूर्वी ‘सागर’वर आपला साहेब बसलाय, असं वक्तव्य जाहीर सभेत केलं होतं. त्याचाच दबाव पोलिसांवर होता की काय, हेही समोर आलं पाहिजे. एकेकाळी मुख्यमंत्रीपद व अलिकडे केंद्रीय मंत्रीपद भूषविलेल्या राणेंनी आज पोलीस व कॅमेऱ्यासमोर थेट टोकाची धमकीच दिली. ठाकरे शिवसेना व राणेंच्या भाजपमधील ‘सामना’ अजून किती दिवस चालणार, हे येणारा काळच ठरवेल. बदलापूर असेल किंवा अन्य कारणांमुळे आधीच गृहविभाग विरोधकांच्या टार्गेटवर आहे. आता मालवणच्या राड्याचे नवे प्रकरण विरोधकांना मिळाले आहे. आता यापुढे राणे पुन्हा राडा करतील की लोकसभा निवडणुकीसारखी शांततेची भूमिका घेतील, हे येत्या काळात समजणार आहे.