ब्रेकिंग

राज्यात ८ ते १५ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता..

‘जिंदगी, जान उसके बाद काम’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई, दि.३: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध तर काही ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. मात्र तरीही कोरोना कमी होण्याचे नाव घेत नसल्याने आता त्यामुळे आता कोरोना रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संपूर्ण लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हळूहळू गोष्टी बंद करून आपण प्रयत्न करून पाहिले. पण लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी एकदम बंद करून हळूहळू गोष्टी सुरू केल्यास फायदा होतो, हा आपला अनुभव असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी आज शनिवारी झालेल्या संपादकांसोबतच्या तसेच विविध समाज घटकांच्या सोबत झालेल्या बैठकीत केले आहे.

राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांसोबत झालेल्या चर्चे दरम्यान त्यांनी लॉकडाऊन अटळ असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आज झालेल्या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आदी उपस्थित होते.कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण पाहता राज्यात कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मत आरोग्यमंत्री टोपे यांनीही व्यक्त केले. त्यामुळे लवकरच संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा लॉकडाऊन 8 ते 15 दिवसांचा असू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

नाट्य, चित्रपट क्षेत्रासह, मल्टिप्लेक्स-चित्रपटगृह चालकांचा शासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रतिसाद

‘ हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही. पण येणाऱ्या बिकट परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावे लागेल, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी नाट्य निर्माता, आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालक संघटनेच्या प्रतिनिधीनांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे, विषाणूबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधीनींही कोरोना रोखण्याच्या शासनाच्या सर्व प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असा प्रतिसादही दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानातून मराठी नाट्य निर्माता संघ तसेच त्यानंतर राज्यातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृह चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय आदी सहभागी झाले.
दृरदृश्य प्रणालीद्वारे दोन सत्रात झालेल्या या संवादात सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, अभिनेते सुबोध भावे, उमेश कामत, नाट्य परिषदेचे प्रसाद कांबळी, ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले. त्यानंतरच्या चित्रपटगृह चालक-मालक संघटनांच्यावतीने निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी, कमल गियानचंदानी, अजय बिजली, नितीन दातार, देवांग संम्पत, कुणाल स्वाहनी, प्रकास चाफळकर, कपिल अग्रवाल, अजय बिजली, सिद्धार्थ जैन, अलोक टंडन, राजेश मिश्रा आदी सहभागी झाले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले की, कोरोनाशी लढा देतांना सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शासनाची भूमिका आहे. तुमच्या व्यवसायाविषयी आत्मियता आहे, म्हणूनच हा संवाद साधतो आहोत. स्थिती बिकट होते आहे. तुम्ही अपराधीपणाची भावना घेऊ नका. आता कुणाला जबाबदार धरणे, योग्य नाही. आता परिस्थितीत स्वीकारायलाच हवी. आता दोष कुणाचा हे शोधण्याची वेळ नाही. मास्क, अंतर राखणे, हात धुणे ही त्रिसुत्री पाळणे आवश्यक आहे. स्वयंशिस्त पाळली असती, तर आजची स्थिती आली नसती. लसीकरणातही आपण सर्वात पुढे आहोत. आम्ही केंद्राकडे अजूनही लस मागत आहोत. पण केंद्रालाही अन्य राज्यांनाही लस द्याव लागत असणार आहे. राज्यात चोवीस कोटी, पंचवीस कोटी लसींची मात्रा आवश्यक आहे. ती येईपर्यंत आपल्याला खबरदारी घ्यावीच लागेल. नुकसान तर पूर्ण राज्याचे होणार आहे. ‘जिंदगी, जान उसके बाद काम,’ काम याप्रमाणे पुढे जावे लागेल. त्यासाठी आता काही पावले उचलावीच लागतील. परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावे लागतील. लोकांमध्ये कोरोनाविषयी जागरुकता निर्माण करावी लागेल. भिती गेली हे चांगले झाले. पण त्यामुळे बेफिकीरी वाढली आहे. या विषाणूचा संसर्ग धोकादायक हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, गेल्या वर्षभरात नाट्यक्षेत्रासह, चित्रपटसृष्टी आणि थिएटर्स चालकांच्या व्यवसायाला फटका बसला आहे. हे मान्य आहे. संक्रमण रोखण्यासाठी आपण सर्वच प्रय़त्न करत आहोत. तुम्ही नियमही पाळत आहात. पण स्वयंशिस्त कमी पडते आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. आपण टेलीआयसीयू सारख्या नवतंत्रज्ञानचा वापर करत आहोत. तरीही विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. एका घरा-घरात रुग्ण वाढत आहेत. कुटुंबं बाधित होत आहेत. त्यामध्ये अत्यवस्थ होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. तुम्ही मनोरंजनातून जनजागृती करत आहात. त्यामुळे तुम्हालाही या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढे यावे लागेल. त्यासाठी सहकार्य कराल, ही अपेक्षा आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.देशमुख म्हणाले, मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट व्यवसायाशी निगडीत लोकांची निर्बधांने अडचण होणार आहे. परंतू रुग्णसंख्येतील वाढ पाहता नाईलाजाने काही निर्बंध लावावे लागणार आहेत. निर्बंध लावतांना मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या सूचनांचा निश्चितच विचार केला जाईल,असेही त्यांनी सांगितले.

थिएटर्स चालक-मालकांचे सहकार्य

नितीन दातार म्हणाले, तात्पुरत्या रुग्णालयांसाठी थिएटर्स, त्याठिकाणी असलेली मुबलक जागांमध्ये काही प्रमाणात व्यवस्था उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. काही ठिकाणी खूर्च्या काढूनही आवश्यकता वाटल्यास व्यवस्था करता येईल.कमल गियानचंदानी म्हणाले, शासनाला पूर्ण सहकार्य करू. जनतेच्या राज्याच्या हितासाठी जो कोणता निर्णय घ्याल, त्याला पाठिंबाच राहील. रोहित शेट्टी म्हणाले, सरकार जो निर्णय घेऊल, त्याच्या सोबत राहू. आपल्या प्रेक्षकांनाही त्रास होतो आहे. एकजुटीने शासनासोबत राहू. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. वेळोवेऱी परिस्थितीचे पुनरावलोकनही केले जावे.यावेळी मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत ते राज्य शासनासोबत असून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले.

राज्यातील अनेक जिल्ह्यात यापूर्वीच जिल्हापातळीवर लॉकडाऊन संदर्भातील कडक नियम लागू केले आहेत.पुण्यात अंशत: लॉकडाऊन केला आहे.बीड, अमरावती, बुलढाणा, सोलापूरमध्येही कडक नियमांची तर काही ठिकाणी विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र दिसून आल्याने आता अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!