मुंबईमहाराष्ट्र

सावधान! आता ‘आरटीओ’च्या वाहनांवर ‘रडार’ प्रणाली, तासाला 700 वर ई-चालान

महाराष्ट्र: वाहन चालविताना जर वाहतूक नियम मोडला तर अवघ्या काही सेंकदात तुम्हाला ई चालान येईल’, कारण आरटीओ कार्यालय आता ‘रडार’ प्रणालीच्या मदतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. त्यासाठी राज्यभरातील आरटीओ कार्यालयांकडील वाहनांवर ‘रडार’ प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
राज्यभरातील आरटीओ कार्यालयांना काही महिन्यांपूर्वी नवीन इंटरसेप्टर वाहन देण्यात आले आहे. या वाहनांमध्ये स्पीडगनची सुविधा आहे. आता याच वाहनांवर रडार सिस्टिम बसविण्यात येणार आहे. यात रडार सिस्टिमसह अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाहनांचे छायाचित्र घेणे यामुळे सोपे झाले आहे.
सध्या १५-२० ई-चालान
सध्या वापरात असलेल्या स्पीड गन प्रणालीद्वारे तासाला १५-२० ई-चालान जारी होतात. मात्र, नव्या रडार प्रणालीमुळे तासाला ७०० ते ८०० ई-चालान तयार करता येणार आहेत. तेही वाहनांना थांबवण्याची गरज न पडता, त्यांच्या वेगासह फोटो कॅप्चर करून नियमभंग नोंदवला जाईल.
५०० मीटर अंतरापर्यंतच्या वाहनाची नोंद
ही रडार प्रणाली ५०० मीटर अंतरापर्यंतच्या वाहनाची नोंद घेणार आहे. वाहनाचा वेग किती आहे, चालकाने सीट बेल्ड लावलेला आहे का, वाहन धोकादायक पद्धतीने चालविले जात आहे का, आदींची पडताळणी करून काही सेकंदात दंडाचे ई-चालान वाहनधारकाला पाठविले जाणार आहे.
एका कार्यालयाला किमान एक वाहन
राज्यातील एका आरटीओ कार्यालयातील किमान एका वाहनावर ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयाअंतर्गंत असलेल्या वाहनांवर रडार बसविण्याचे काम सुरू झाले आहे.
मराठवाड्यातील १७ वाहनांवर यंत्रणा
मराठवाड्यातील आरटीओ कार्यालयांच्या एकूण १७ वाहनांवर ही ‘रडार’ प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही प्रणाली बसविण्यासाठी एका वाहनाला ६ तास लागतात. त्यानुसार आगामी काही दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!