दिलासादायक : राज्यात आज १० हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. आकडे कमी होताना दिसत असले तरी धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहेच. पण त्यातल्या त्यात सकारात्मक गोष्ट म्हणजे राज्यातली कोविड आकडेवारी. राज्यातल्या दैनंदिन बाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज अधिक घट झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून गेल्या २४ तासातली कोरोना आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या २४ तासात ८,९१२ नवबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातल्या करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९ लाख ६३ हजार ४२० झाली आहे.तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.७६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. कालच्या तुलनेत या प्रमाणातही किंचित वाढ झाली आहे.
नवबाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आजही अधिक आहे. आज राज्यात १० हजार ३७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आता ५७ लाख १० हजार ३५६ वर पोहोचला आहे.
राज्यात गेल्या २४ तासात २५७ रुग्णांचा मृत्यू झाला. आता राज्यातला मृत्यूदर १.९७ टक्के आहे. तर राज्यात सध्या एक लाख ३२ हजार ५९७ रुग्ण उपचाराधीन आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९३,१२,९२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,६३,४२० (१५.१७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,०६,५०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.