इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची १२ वाजेपर्यंतच मुदत,उद्या भरावा लागेल पाच हजारांचा दंड

नवी दिल्ली :- सरत्या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. तसंच आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याचा देखील आजच शेवटचा दिवस आहे. करदात्यांना आज रात्री बारा वाजेपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न दाखल करता येणार आहे.जर आज रात्री पर्यत इनकम टॅक्स रिटर्न न भरल्यास नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पाच हजारांचा दंड बसू शकतो.
आर्थिक वर्ष २०१९-२० साठी दंडाची रक्कम दहा हजार रुपये होती. मात्र, २०२०-२१ वर्षासाठी त्यामध्ये कपात करून ती पाच हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा अधिक आहे, अशा सर्वांनी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणे आवश्यक असते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा आयटीआर दाखल करण्यासाठी दोनदा मुदत वाढवण्यात आली होती. साधारणपणे जुलैपर्यंत आयटीआर दाखल करता येतो. मात्र, कोरोनामुळे पहिल्यावेळेस ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. त्यामध्ये पुन्हा वाढ करून ती ३१ डिसेंबर करण्यात आली. आज आयटीआर भरण्याची मुदत संपत आहे. रात्री बारानंतर आयटीआर भरणाऱ्या करदात्यांकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.