क्राइम

धक्कादायक : मुंबईत मालाड परिसरात केक आणि पेस्ट्रीतून हाय प्रोफाईल लोकांना गांजाचा पुरवठा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचं प्रकरण समोर आल्यापासून एनसीबी सक्रिय झालं आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने NCB पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे एनसीबी अधिकाऱ्यांनी यावेळी थेट एका बेकरीवर छापा टाकला. एनसीबीची ही कारवाई यशस्वी ठरली. कारण या बेकरीमध्ये प्रचंड महाग असलेला 160 ग्रॅम गांजा मिळाला आहे. विशेष म्हणजे एनसीबीने पहिल्यांदाच अशा ड्रग्ज बेकरी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ड्रग्ज माफिया कोणकोणत्या मार्गाने ड्रग्जची तस्करी करतात हे आता यातून स्पष्ट होताना दिसत आहे 

एनसीबी अधिकाऱ्यांनी कारवाई नेमकी कशी केली?

एनसीबी अधिकाऱ्यांना मुंबईच्या मालाड येथील एका बेकरीतून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी संबंधित बेकरीत थेट छापा टाकला. यावेळी एका डब्ब्यात अधिकाऱ्यांना 160 ग्रॅम गांजा मिळाला. पोलिसांनी बेकरीतील कर्मचाऱ्यांची चौकशी केला तेव्हा सर्व प्रकार उघड झाला 

बेकरीतील तिघांना अटक

संबंधित बेकरीतून केक आणि पेस्ट्रीद्वारे हाय प्रोफाईल परिसरातील नागरिकांना ड्रग्ज पुरवठा केला जायचा. एनसीबी अधिकाऱ्यांनी बेकरीतील सर्व ड्रग्ज ताब्यात घेतलं. तसेच बेकरीतील तिघांना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास अधिकारी करत आहेत. तसेच या कारवाईतून ड्रग्ज माफियांच्या आणखी मोठ्या जाळ्याचा भंडाफोड होण्याचा अंदाज आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचं प्रकरण समोर आल्यापासून एनसीबी सक्रिय झालं आहे. तेव्हापासून एनसीबीने आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. अनेक ड्रग्ज माफियांना अटक केली आहे. तसेच बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांनाही पकडलं आहे.

अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्रींची देखील चौकशी केली आहे. एनसीबीने नुकतंच म्हणजेच दोन दिवसांआधी दक्षिण मुंबईतील विदेश डाक कार्यालयात मोठी कारवाई केली होती. एनसीबीने तिथून जळपास 2.2 किलो गांजा जप्त केला. विशेष म्हणजे तो गांजा कॅनेडाहून मुंबईत पार्सलद्वारे पाठवण्यात आला होता. संबंधित पार्सल नेमकं कुणासाठी होतं याचा तपास सध्या एनसीबी अधिकारी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!