महाराष्ट्र

शिवाजी महाराजांची थोरवी अशा घटनेनं कमी होणार नाही, अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही- अजित पवार

छत्रपती शिवरायांच्या कर्नाटकातील पुतळा विटंबना घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध

मुंबई, दि. १८ डिसेंबर – बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून या घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

कर्नाटक सरकार आणि केंद्रसरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!